विकासकामांसाठी आमदार क्षीरसागरांचा पाठपुरावा; मंत्री शिवेंद्रराजे, गोरेंकडे रस्ते, तिर्थक्षेत्र विकासाची मागणी
Sandeep Kshirsagar: बीड विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण व शहरी भागाचा सर्वांगीण विकास करणे आणि नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे.
दत्ता देशमुख
बीड : राज्यात पक्ष सत्तेत नाही, नगरपालिकेत सत्ता नाही. परंतु, मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) आपल्या परिने पाठपुरावा करत आहेत. बुधवारी त्यांनी बीड मतदार संघातील विकास रस्ते, तिर्थक्षेत्र विकास कामांना निधी मिळावा, यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosle) आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांची भेट घेतली. क्षीरसागर यांनी भोसले यांच्याकडे बीड मतदारसंघातील रस्त्यांची दैना आणि त्यामुळे ग्रामीण भागातील दळणवळणार होणारा विपरित परिणाम कानावर घालून कामांना मंजुरी व निधी देण्याची मागणी केली.
त्यावर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. यासह मतदारसंघात विविध धार्मिकस्थळे असून या धार्मिक स्थळांना माणणारे मोठे भाविक आहेत. मात्र, या ठिकाणी स्वच्छतागृहे, पार्किंग, रस्ते आणि इतर सुविधांची वाणवा असल्याचे त्यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या लक्षात आणून दिले. ‘तीर्थक्षेत्र विकास योजने’अंतर्गत तीर्थक्षेत्रांच्या विकास कामांसाठी विशेष विकास निधी मंजूर करून ग्रामीण भागातील बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेल्या विकासकामांना विशेष निधी देऊन तातडीने मार्गी लावण्याची मागणी यावेळी केली. त्यावर मंत्री जयकुमार गोरे यांनी सर्व विषयांवर सकारात्मक भूमिका घेत लवकरच आवश्यक मंजुरी देण्याची ग्वाही दिली.
बीड विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण व शहरी भागाचा सर्वांगीण विकास करणे आणि नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे. मतदारसंघातील प्रत्येक कामाचा शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करून विकासकामांना गती देण्याचा माझा प्रयत्न कायम असेल आमदार संदीप क्षीरसागर यांनी म्हटले आहे.