आम्ही टॅक्स कमी केला, तुम्ही कर्मचाऱ्यांचे पगार वाढवले का?; मोदींचा उद्योगपतींना थेट सवाल

PM Modi सरकारने उद्योगांना चालना देण्यासाठी टॅक्समध्ये कपात केली, इन्कम टॅक्समध्येही सवलत दिली. तुम्ही कर्मचाऱ्यांना काय दिलं?

  • Ninad K
  • Written By: Published:
PM Modi On employee Salary Hike

PM Modi On Employee Salary Hike : केंद्र सरकारने उद्योगांना चालना देण्यासाठी कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात केली, नोकरदारांना दिलासा देण्यासाठी इन्कम टॅक्समध्येही सवलत दिली. मात्र, या सवलतींचा फायदा सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना कितपत झाला? कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार वाढवले का? नवीन रोजगाराच्या संधी निर्माण केल्या का? असे थेट सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील बड्या उद्योगपतींना केले आहेत. नवी दिल्लीत आयोजित FICCI च्या वार्षिक बैठकीत बोलताना मोदी यांनी उद्योग क्षेत्राला कर्मचाऱ्यांच्या कल्याणावर लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन केलं.

‘आम्ही टॅक्स कमी केला, तुम्ही कर्मचाऱ्यांचे पगार वाढवले का?’

FICCI च्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी सरकारने उद्योग आणि नोकरदारांसाठी घेतलेल्या निर्णयांची आठवण करून दिली. मोदी म्हणाले की, 2014 मध्ये कॉर्पोरेट टॅक्स 30 टक्के होता. सरकारने तो कमी करून 22 टक्क्यांपर्यंत आणला. त्याचप्रमाणे नवीन आयकर प्रणालीमध्ये 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर करसवलत उपलब्ध करून दिली आहे. मात्र, सरकारने करांमध्ये सवलत दिल्यानंतर उद्योगजगताने काय केलं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. PM Modi On Employee Salary Hike

‘आम्ही कॉर्पोरेट टॅक्स कमी केला, इन्कम टॅक्स कमी केला. पण तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली का? त्यांच्या पगारात वाढ केली का?’ असा थेट प्रश्न मोदी यांनी उद्योगपतींना विचारला. सरकारकडून सवलतींची अपेक्षा केली जाते, मात्र त्याबदल्यात कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कंपन्यांनीही पुढाकार घ्यायला हवा, असा संदेश त्यांनी दिला.

पंतप्रधानांनी करकपातीचा मुद्दा मांडल्यानंतर सभागृहात अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. यावरही त्यांनी मिश्किल टिप्पणी केली. मोदी म्हणाले, मला माहिती आहे, या गोष्टीवर टाळ्या वाजणार नाहीत. कारण तुमची भूक इतकी मोठी आहे की कितीही दिलं तरी तुमचं पोट भरत नाही. तसंच, उद्योगपती नेहमी सरकारकडे आणखी सवलतींची मागणी करतात. मात्र, त्यांनी स्वतःहून किती नवीन कर्मचाऱ्यांना रोजगार दिला आणि किती जणांचे पगार वाढवले, याचाही विचार करायला हवा, असं त्यांनी सुनावलं.

यावेळी मोदी यांनी उद्योगजगताला सरकारच्या सुधारणांमध्ये सहभागी होण्याचं आवाहनही केलं. ते म्हणाले की, देश सध्या ‘रिफॉर्म एक्स्प्रेस’वर वेगाने पुढे जात आहे. सरकार उद्योगांसोबत पाऊल टाकण्यासाठी तयार आहे. मागील सरकारांबाबत उद्योगजगताचा अनुभव चांगला नसल्यामुळे त्याचा परिणाम सध्याच्या सरकारलाही सहन करावा लागत असल्याचं मोदी म्हणाले. मात्र, हे पूर्वीचे सरकार नाही, तर उद्योगजगताची मित्र सरकार आहे. त्यामुळे कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत, याबाबत उद्योगपतींनी कोणताही संकोच न बाळगता सरकारला सूचना द्याव्यात, असं आवाहन त्यांनी केलं.

पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याच्या उद्दिष्टाचाही उल्लेख केला. उद्योग क्षेत्राने केवळ आजच्या नफ्याचा विचार न करता पुढील 20 वर्षांचं नियोजन करायला हवं. देशाच्या विकासात आपलं योगदान काय असेल, याचं आत्मपरीक्षण उद्योगांनी केलं पाहिजे, असं मोदी म्हणाले. यावेळी मोदी यांनी भारताच्या औषधनिर्मिती क्षेत्राचं उदाहरण दिलं.

भारताला जगाची ‘फार्मसी’ म्हटलं जातं. मात्र, आजही औषधनिर्मितीसाठी लागणाऱ्या API म्हणजेच Active Pharmaceutical Ingredients आणि इतर मध्यवर्ती घटकांची भारताला मोठ्या प्रमाणात आयात करावी लागते. या परिस्थितीत भारतातच अशा घटकांचं उत्पादन कसं वाढवता येईल, याचा उद्योगांनी विचार करायला हवा, असं त्यांनी सांगितलं. तसंच, जागतिक बाजारपेठेत मागणी असलेल्या उत्पादनांची निर्मिती भारतात करण्यावर भर द्यायला हवा. खनिज क्षेत्रातही भारताने अधिक कौशल्य आणि क्षमता विकसित करण्याची गरज असल्याचं मोदी यांनी स्पष्ट केलं.

उद्योगपतींसाठी मोदींचा संदेश काय?

पंतप्रधान मोदी यांच्या या भाषणातून उद्योगजगताला एक स्पष्ट संदेश देण्यात आला आहे. सरकारकडून करसवलती आणि उद्योगपूरक धोरणांची अपेक्षा करताना कंपन्यांनीही रोजगारनिर्मिती, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि त्यांच्या कल्याणाला प्राधान्य द्यायला हवं. कारण उद्योगांची प्रगती केवळ कंपन्यांच्या नफ्यातून मोजली जाऊ नये, तर त्या उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं आयुष्य किती सुधारलं, यावरूनही मोजली गेली पाहिजे. आता मोदींच्या या खड्या प्रश्नानंतर देशातील बड्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी काय पावलं उचलतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

follow us