Driver’s license suspension if fine not paid within 30 days : शहरातील वाहतूक नियमभंग करणाऱ्या आणि ई-चलनचा दंड प्रलंबित ठेवणाऱ्या वाहनधारकांवर आता कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. शहर वाहतूक शाखेकडून संबंधित वाहनमालकांना अधिकृत नोटीस पाठविण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, नोटीस मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत दंड न भरल्यास चालक परवाना निलंबन तसेच न्यायालयीन कारवाई करण्यात येणार आहे.
वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आले आहे की, अनेक वाहनधारक वाहतूक नियमांचे उल्लंघन करूनही ई-चलनचा दंड भरत नाहीत. त्यामुळे थकबाकीदार वाहनधारकांना अधिकृत नोटीस बजावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधितांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून ‘एमएचपीइसीएच-जी’ या अधिकृत आयडीवरून एसएमएसद्वारे नोटीस पाठविण्यात येणार आहे.
ही विशेष मोहीम 26 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत राबवली जाणार आहे. या कालावधीतच अधिकृत संदेश प्राप्त होतील. याशिवाय इतर कोणतेही संदेश आल्यास ते संशयास्पद समजावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील आणि वाहतूक पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, नोटीस मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत दंडाची रक्कम भरणे बंधनकारक आहे. अन्यथा संबंधित चालकाचा वाहन परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पाठवण्यात येईल.
अहिल्यानगरला मोठी संधी, संगमनेर ते संसद? बाळासाहेब थोरातांच्या नावाची दिल्लीपर्यंत चर्चा
तसेच प्रकरण न्यायालयात दाखल करून कायदेशीर कारवाईही करण्यात येईल. वाहनधारकांसाठी दंड भरण्याचे अधिकृत पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दंड भरण्यासाठी https://mahatrafficechallan.gov.in या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करता येईल. तसेच पुणे ट्रॅफिक पोलिस (पीटीपी) मोबाइल अॅपद्वारेही ऑनलाइन भरणा करता येणार आहे.
याशिवाय जवळच्या वाहतूक विभाग कार्यालयात क्यूआर कोड, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातूनही दंड भरता येईल. दरम्यान, सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांकडून कोणतीही एपीके फाइल पाठवली जात नाही, त्यामुळे अशा फाइल्स डाऊनलोड करू नयेत. तसेच कोणालाही ओटीपी शेअर करू नये आणि फक्त अधिकृत पेमेंट पद्धतींचाच वापर करावा.
संशयास्पद लिंक किंवा कॉल आल्यास तात्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. वाहतूक नियमांचे पालन करून आणि वेळेत दंड भरून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.
