राज्यात दुष्काळाचे पंचनामे सुरू होणार; मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रशासनाला महत्वाचे आदेश

Drought Affected Areas : सिंचनाची सोय नसलेल्या भागात पिकांची काढणी करूनही उत्पादन हाती लागण्याची शक्यता कमी आहे.

News Photo   2026 09 16T160415.353

Drought Affected Areas

Damage Assessments Drought Affected Areas : राज्यात ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पावसानं (Rain) मोठी ओढ दिल्यामुळं खरीप हंगाम संकटात आला आहे. अनेक भागांत पिकं करपू लागल्यानं शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 ऑक्टोबरपासून दुष्काळी स्थितीचे पंचनामे सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्रीय आपत्ती निधीच्या (NDRF) निकषांनुसार ही कार्यवाही केली जाणार आहे.

दुष्काळ जाहीर करण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून सातत्यानं होत आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतही पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा झाली. ग्रामीण भागातील मंत्र्यांनी अनेक ठिकाणी खरीप पिकांची अवस्था गंभीर असल्याचं मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलं. महिनाभर पाऊस नसल्यानं मूग, मटकी, चवळी यांसारखी कमी कालावधीत येणारी पिकं वाया गेली आहेत.

सिंचनाची सोय नसलेल्या भागात पिकांची काढणी करूनही उत्पादन हाती लागण्याची शक्यता कमी आहे. पावसाअभावी उसाची वाढ खुंटली असून, नव्या ऊस लागवडीसमोरही पाण्याचं संकट निर्माण झालं आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन सरकारनं तातडीनं उपाययोजना कराव्यात, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे.

पावसाच्या तुटीचा मराठवाड्याच्या शेतीला फटका; 3.5 लाख हेक्टर क्षेत्र घटलं, वाचा चिंताजनक आकडेवारी

राज्यातील 20 जिल्ह्यांतील 86 तालुक्यांमध्ये पावसाचा मोठा खंड पडला आहे. यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील 31, पश्चिम महाराष्ट्रातील 17, मराठवाड्यातील 16 आणि विदर्भातील 22 तालुक्यांचा समावेश आहे. अहिल्यानगरमधील कर्जत आणि पुण्यातील शिरूर येथे 43 दिवसांहून अधिक काळ पाऊस झालेला नाही. खामगाव, संगमनेर, परांडा, देवळाली, कळवण, इंदापूर, फलटण आणि माळशिरस येथे 40 दिवसांचा पावसाचा खंड नोंदविण्यात आला आहे.

दरम्यान, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे सोमवारपासून दुष्काळी भागांच्या पाहणी दौऱ्यावर जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात अकोला, वाशिम, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांची पाहणी केली जाणार असून, त्यानंतर अहिल्यानगर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांचा दौरा केला जाणार आहे. खरीप पिकांसोबतच पावसाचा मोठा खंड पडलेल्या भागातील फळबागांचीही पाहणी केली जाणार असल्याचं भरणे यांनी सांगितलं.

दरम्यान, दुष्काळी परिस्थितीचे अधिकृत पंचनामे 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार असले तरी टंचाई निवारणाच्या उपाययोजना त्यापूर्वीच सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी महिनाभरापासून पाऊस नसल्याची दखल घेत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Exit mobile version