New Education Policy Maharashtra : राज्यातील शाळा जून महिन्यात सुरू होणार आहेत. शाळा सुरू होण्याआधीच शिक्षण विभागाने मोठा निर्णय जाहीर केला आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांत आता इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा शिकवली जाणार नाही. शिक्षण विभागाने या संदर्भात घेतलेला आधीचा निर्णय स्थगित केला आहे. राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024 नुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी, इंग्रजीसह तृतीय भाषा म्हणून हिंदी शिकवण्यात (Hindi Language) येणार होती. जून 2025 पासून सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक सत्रापासून या धोरणाची अंमलबजावणी सुरू होणार होती. परंतु, या निर्णयाला राज्यात प्रचंड विरोध झाला. त्यामुळे राज्य सरकारने हा सगळाच बेत रद्द केला आहे.
सीबीएसईने राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार फक्त दोन भाषांचे धोरण स्वीकारले असताना राज्य शिक्षण मंडळाकडून तीन भाषांचा आग्रह का धरला जातोय असा प्रश्न उपस्थित झाला होता. यानंतर शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये पहिलीपासून तिसरी भाषा शाळांत शिकवण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे असे भुसे यांनी सांगितले. फक्त हिंदीच नाही तर कोणतीही भाषा तिसरी भाषा म्हणून शिकवण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आल्याचे मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले.
ब्रेकिंग : आता पहिलीपासूनच हिंदी भाषा अनिवार्य; भाषा वादात फडणवीस सरकारने जारी केला मोठा आदेश
सीबीएसईच्या पत्रकात इयत्ता दुसरीपर्यंतचे शिक्षण मातृभाषेत किंवा राज्यभाषेत व्हावे असे नमूद करण्यात आले आहे. या मुद्द्यावर बोलताना भुसे म्हणाले, स्थानिक पातळीवरील भाषा बोलणारे शिक्षक त्या शाळांमध्ये नियुक्त केले जातील. सीबीएसईच्या अनेक चांगल्या गोष्टींचा अभ्यास करुन त्या गोष्टी आपण स्वीकारणार आहोत. त्यामुळे इयत्ता दुसरीपर्यंत मातृभाषेतून शिक्षण या धोरणाबाबत तज्ज्ञ अभ्यासक आणि सुकाणू समिती यांच्याशी चर्चा करुनच निर्णय घेण्यात येईल, असे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले.