Eknath Shinde and Devendra Fadnavis inaugurate Samruddhi Highway : राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरला द्रुतगती मार्गाने जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) दुसऱ्या टप्प्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते उद्घाटन झाले. महामार्गाचा दुसऱ्या टप्पा सुरू झाल्याने आता नागपूर ते भरवीर (नाशिक) हे अंतर सहा तासांत कापता येणार आहे. दरम्यान, समृद्धी महामार्गामुळं शेतकऱ्यांची समृध्दी झाली, दिलेल्या शब्दाला आम्ही जागतो, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणाही साधला.
मुख्यमंत्री शिंदें म्हणाले, दिलेल्या शब्दाला आम्ही जागतो. आम्ही सर्व कामे जाहिरपणे करतो. काही लोकांप्रमाणे आम्ही घरात बसून काम करत नाही, असा खोचक टोला शिंदेंनी ठाकरेंना लगावला. ते म्हणाले, महामार्गाला अनेक अडथळे आले. विरोध झाला. काहींनी सभा घेऊन विरोध जाणीवपूर्वक विरोध केला. मात्र, अडचणीतून मार्ग काढत आणि पंतप्रधान मोदींच्या सहकार्याने येणारे सर्व अडथळे दूर केले. दुसरा टप्पा आज सुरू झाला. आता पुढील 200 किलोमीटरचा महामार्ग डिसेंबरपर्यंत सुरू होईल, असं शिंदे म्हणाले.
ते म्हणाले, समृद्धी महामार्गामुळं शेतकऱ्यांची समृध्दी झाली. समृद्धी महामार्ग अनेकांना घोषणा वाटायची. मात्र, आम्ही या महामार्गासाठी कमी वेळात जमीन ग्रहन केली. शेतकऱ्यांना 3 तासात पैसे देण्याचं काम आम्ही केलं. त्यामुळं शेतकऱ्यांचा विश्वास वाढला, असं शिंदे यांनी सांगितलं.
यावेळी बोलतांना सीएम शिंदे यांनी नगरविकास मंत्री असतांनाचा एक किस्सा देखील सांगितला. फडणवीस सरकारमध्ये मी मंत्री होतो. तेव्हा माझ्याकडे नगरविकास मंत्री खातं होतं. तेव्हा माझ्याकडे फारसं काम नव्हतो. मी मोकळाच असायचो. तेव्हा फडणवीस म्हणाले होत, असं काम देतो की, तुम्हाला दुसरं काम करण्याची गरजच नाही. त्यानंतर त्यांनी मला समृद्धीचे काम दिलं. आणि मी रस्त्याचे कामही केलं.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) द्वारे बांधण्यात येत असलेल्या नागपूरजवळील शिवमडका ते शिर्डीजवळील कोकणथम या 701 किलोमीटर लांबीच्या 520 किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचे काम डिसेंबरमध्येच सुरू झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी ते नागपूर दरम्यानच्या 520 किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. त्यानंतर आता शिर्डी ते इगतपुरी हा दुसरा टप्पा सुरू झाला. हा दुसरा टप्पा 80 किलोमीटरचा आहे. त्यामुळं नागपूर ते इगतपुरी नॉन स्टॉप प्रवास आता शक्य होणार आहे.