मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) भाजपसोबत सरकारमध्ये अस्वस्थ आहेत का? असा सवाल सध्या विचारला जात आहे. याच कारण ठरलं आहे ते वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचे सध्याचे एक भाषण. नुकतंच मुंबईमध्ये एका जाहीर कार्यक्रमात बोलताना आंबेडकर यांनी एकनाथ शिंदे यांनी खदखद बोलून दाखविली असल्याचं सांगितलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आणि माझी भेट झाली होती. यावेळी त्यांनी त्यांची खदखद बोलून दाखविली होती. त्यावर आपण त्यांना बाहेर पडण्याची अन् सोबत येण्याची ऑफर दिली असल्याचं म्हणतं मोठी खळबळ उडवून दिली. (Prakash Ambedkar offer to cm Eknath Shinde to come with vanchit Bahujan Aaghadi)
महाराष्ट्रामध्ये या सरकराच्या विरोधात मानसिकता आहे. पण एवढचं आहे की सर्वोच्च न्यायायलाने हिंमत दाखविली नाही. त्यांनी हे सरकार गैर आहे, राज्यपालांच्या चुकीने हे सरकार आले, हे दाखवून दिले. पण त्यांनी सांगितले की शिंदे तुम्ही चालू ठेवा. राज्यपालांचा निर्णय चुकीचा होता, हे समोर आल्यानंतर आमची अपेक्षा होती की, कलम ३५६ नुसार हे सरकार बरखास्त करा अशी शिफारस करतील. पण तसे झाले नाही, त्यानंतर या सगळ्यांनीही या निर्णयाच्या संदर्भात नरोवा-कुंजरोवाची भूमिका घेतली.
या निर्णयाच्या तीन दिवसांनंतर माझी आणि एकनाथ शिंदेंची भेट झाली. मी त्यांना म्हटलं पेढे द्या.ते म्हणाले, पेढ्याच काय घेऊन बसलात? तुम्हाला दुधाने अंघोळ घालतो. दिड वर्ष आम्ही आता अबाधित झालो. मी म्हणालो मला कशाला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना घाला. आणलयं तुमचं सरकार सर्वोच्च न्यायालयाने, टिकवलं त्यांनी, आमचा काय त्यात रोल? ते म्हणाले, प्रकाशराव काहीही असो, रिक्षावाल्याला दिड वर्ष मिळाली. मी म्हटलं म्हणूनच मी तुमच्यावर टीका करत नाही. आतापर्यंत श्रीमंताची माणसं मुख्यमंत्री झाली, आता एक रिक्षावाला मुख्यमंत्री झाला, त्यातच आमचा आनंद आहे.
पुढे मी काही बोलण्यापेक्षा शिंदेंच म्हणाले, प्रकाशराव ही राज्यघटना आहे म्हणून, नाही तर कोणी विचारलं नसतं आपल्याला. मी म्हटलं तुमचे मित्र, त्यांचं काय? त्यावर ते म्हणाले, काय अवघडं जागेचं दुखणं असतात. काही गोष्टी बोलायच्या नसतात, फक्त सहन करायच्या असतात. म्हटलं पडा बाहेर, आपण एकत्र येऊ आणि पुढे जाऊ, अशी ऑफर देत आंबेडकर यांनी एकनाथ शिंदे यांना भाजपचा हात सोडून सरकारमधून बाहेर पडण्याचा सल्ला दिला.