भाजपच्या तालावर नाचणारे स्वतंत्र नाहीत, तर ते भाजपचे कैदी; अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सध्याच्या निवडणूक प्रक्रियेवर गंभीर चिंता व्यक्त केली.
Adv. Prakash Ambedkar’s attack on the ruling party : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण अधिकच तापले असून, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सध्याच्या निवडणूक प्रक्रियेवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. उमेदवारांची पळवापळवी, दमदाटी आणि दबावतंत्र यामुळे महाराष्ट्राचा बिहार होतो की काय, अशी भीती निर्माण झाल्याचं ते म्हणाले. ‘आतापर्यंत जे काही घडले आहे, त्याला मतदारच काही अंशी जबाबदार आहेत. मतदारांनी पैसे, दारू आणि आमिषांना बळी न पडता प्रस्थापितांना हद्दपार केलं पाहिजे. महापालिका निवडणुकीत नवा पायंडा पाडून खरी लोकशाही प्रस्थापित करण्याची हीच योग्य वेळ आहे,’ असे आवाहन अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
महापालिका निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने येथील थोरात चौक बाजार मैदानात आयोजित वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी आणि पुरस्कृत 12 उमेदवारांच्या ‘विजयी संकल्प’ सभेत ते बोलत होते. या सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ‘भाजप हा देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचारी पक्ष आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे भाजपच्या तालावर नाचत असून, ते स्वतंत्र राहिलेले नाहीत. भाजपच्या तालावर नाचणारे नेते म्हणजे भाजपचे कैदीच आहेत,’ असा घणाघाती आरोप त्यांनी केला.
मोठा निर्णय, मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी 29 महापालिका क्षेत्रात 15 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर
सभेत सिद्धार्थ कांबळे आणि संदीप देसाई यांनीही मतदारांना संबोधित केले. धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीचा हा लढा असून, मताचे हत्यार वापरून परिवर्तन घडवण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या अनेक उमेदवारांनी पक्षाच्या एबी फॉर्मवर भरलेले अर्ज माघारी घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. निवडणुकीच्या रिंगणात सध्या केवळ चार उमेदवार शिल्लक राहिले आहेत. या माघारीबाबत अॅड. प्रकाश आंबेडकर यांना पत्रकार परिषदेत विचारणा करण्यात आली असता, त्यांनी यावर थेट भाष्य करण्याचे टाळले. मात्र, ‘राजकारणात काही निर्णय परिस्थितीनुसार घ्यावे लागतात,’ एवढेच सूचक उत्तर त्यांनी दिले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित-आप आघाडीच्या या भूमिकेमुळे आगामी राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
