मोठा निर्णय, मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी 29 महापालिका क्षेत्रात 15 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर
राज्य शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे तसेच सार्वजनिक उपक्रमांना सुट्टी.
Public holiday declared on January 15 in 29 municipal areas :राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. प्रचाराच्या रणांगणात बडे नेते उतरले असून, विविध ठिकाणी प्रचारसभा, रोड शो आणि बैठकींना वेग आला आहे. दुसरीकडे, कार्यकर्त्यांसह नागरिकांनाही प्रचारसभांची उत्सुकता लागली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग आणि प्रशासनानेही तयारीला गती दिली आहे. ईव्हीएमसह सर्व प्रशासकीय तयारी जवळपास पूर्ण झाली असून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे.
दरम्यान, राज्य सरकारने मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. गुरुवार, 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील 29 महापालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी लागू करण्यात आली आहे. याबाबतची अधिकृत अधिसूचना राज्य शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार, सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे तसेच सार्वजनिक उपक्रमांना ही सुट्टी लागू राहणार आहे. विशेष म्हणजे, संबंधित महानगरपालिका निवडणूक क्षेत्रातील मतदार असलेले, पण कामानिमित्त मतदारसंघाबाहेर कार्यरत असलेले मतदार यांनाही ही सुट्टी लागू असेल.
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी गुरुवार, दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी #मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित मतदानक्षेत्रात १५ जानेवारी २०२६ रोजी सार्वजनिक #सुट्टी जाहीर करण्यात आल्याची #अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे.
ही अधिसूचना सर्व विभागांच्या प्रशासकीय… pic.twitter.com/LvfuVV8E4G— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 8, 2026
महानगरपालिका क्षेत्रांतील केंद्र सरकारची कार्यालये, बँका, निमशासकीय कार्यालये आणि तत्सम आस्थापनांनाही मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी देण्यात आली आहे. सार्वजनिक सुट्टी लागू असलेल्या महापालिकांमध्ये बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, मीरा-भाईंदर, वसई-विरार, पनवेल, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली-मिरज-कुपवाड, छत्रपती संभाजीनगर, नांदेड-वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर यांचा समावेश आहे.
दरम्यान, मतदान हा लोकशाहीचा उत्सव असून, प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
