शरद पवारांचा आजही हुकमी एक्का अजित पवारच होते, जयंत पाटलांना दांदांच्या आठवणीत अश्रू अनावर

राजकारणात गोड बोलाव लागतं, असं अजितदादांना आम्ही सांगायचो. त्यावेळी ते म्हणाले की, गोड तुम्ही बोला, ते माझ्या स्वभावात नाही.

  • Written By: Published:
Jayant Patill

अजित पवारांचं शरद पवारांवर खूप प्रेम होतं. आजही शरद पवारांचा (Sharad Pawar) हुकमी एक्का हे अजित पवारच होते अशा शब्दात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शोकसभेचा कार्यक्रम वरळी डोम येथे पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते.

अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देताना जयंत पाटील म्हणाले की, “कुठून सुरू करू आणि कुठे थांबू अशा अनेक आठवणी अजितदादांसोबत आहेत. 1991 पासून आमची राजकीय कारकिर्द जवळपास एकत्रच सुरू झाली. त्यानंतर सभागृहातही आम्ही एकत्रच बसायचो. 2014 पासून तर शेजारी बसण्याचे अनेक प्रसंग आले. खुल्या मनाचा, दिलदार मनाचा आणि विरोध करायचा असले तर ठामपणे विरोध करणारा नेता म्हणून अजित पवारांकडे पाहिलं जातं.

ऊस दिसला नाही अन् दादांनी चेअरमनला फोन लावला; जयंत पाटलांनी सांगितला अजितदादांचा तो किस्सा

राजकारणात गोड बोलाव लागतं, असं अजितदादांना आम्ही सांगायचो. त्यावेळी ते म्हणाले की, गोड तुम्ही बोला, ते माझ्या स्वभावात नाही. इतकं रोखठोकपणे अजितदादा बोलायचे असं जयंत पाटील म्हणाले. त्याचबरोबर राजकारणात पुन्हा एकसंघपणे काम करायचं, पुन्हा एकदा एकत्र येऊन हळुहळु संघटना मजबूत करायचं धोरण अजित पवारांनी स्वीकारलं होतं. पुन्हा एकदा नव्याने काम सुरू करावं असं अजितदादांचं स्वप्न होतं. पण हे सगळं होत असतानाच नियतीने घात केला असंही जयंत पाटील म्हणाले.

आर आर आबा गेल्यानंतर मी सतत म्हणायचो, आबा जेष्ट आहेत ते पुढे आहेत, त्यानंतर तुम्ही आणि मग मी असेन. मी करियरच्या बाबत बोलायचो, मात्र हे असं होईल असं वाटलं नव्हतं. दादानी स्वतःच्या बारामतीची काळजी घेतली महाराष्ट्राची काळजी देखील घेतली. तसंच, अजित पवारांना टापटीपपणा आवडायचा. एखाद्या मतदारसंघातील एखादं काम करायचं असेल तर स्पष्टपणे फोन करून सांगायचे. अजित पवारांना जे करायचं असायचं ते तेच करायचे अशी आठवणही जयंत पाटलांनी सांगितली.

follow us