हिंदुत्वावरून टीका करणाऱ्या भाजपवर उद्धव ठाकरेंचा पलटवार; ‘सामना’तून जोरदार फटकेबाजी

भाजपने काँग्रेससोबत, तर काही ठिकाणी एआयएमआयएमसोबत युती केल्याचा आरोप करत ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर सणसणीत शब्दांत टीका

  • Written By: Published:
Untitled Design (225)

Uddhav Thackeray’s counterattack on BJP criticizing Hindutva : हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर सातत्याने टीका करत असतानाच आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपवर जोरदार पलटवार केला आहे. भाजपने काही महानगरपालिकांमध्ये काँग्रेससोबत, तर काही ठिकाणी एआयएमआयएमसोबत युती केल्याचा आरोप करत ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर सणसणीत शब्दांत टीका करण्यात आली आहे. शिवसेनेनं म्हटलं आहे की, शिवसेना काँग्रेससोबत गेली तेव्हा भाजपने हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करत जोरदार टीका केली होती. मात्र आता स्वतः भाजपने महाराष्ट्रातील काही महापालिकांमध्ये काँग्रेस आणि एआयएमआयएमसोबत हातमिळवणी केल्याचे उघड झाल्याने भाजप अडचणीत सापडली आहे.

अग्रलेखात असा आरोप करण्यात आला आहे की, अकोटमध्ये भाजपने एआयएमआयएमसोबत उघडपणे युती केली, तर अंबरनाथ महापालिकेत शिंदे गटाला सत्तेत ठेवण्यासाठी भाजपने काँग्रेसशी हातमिळवणी केली. सुरुवातीला हे सर्व व्यवहार गुप्तपणे सुरू होते, मात्र हे ‘लफडे’ उघडकीस आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुलासा करावा लागला. देवेंद्र फडणवीस यांनी अशा युती सहन केल्या जाणार नाहीत आणि संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे जाहीरपणे सांगितले. मात्र शिवसेनेनं या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, अंबरनाथसारख्या ठिकाणी घडलेल्या घटनांची माहिती भाजप प्रदेशाध्यक्षांना नव्हती, असे म्हणणे हास्यास्पद असल्याचा टोला लगावला आहे.

मोठा निर्णय, मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी 29 महापालिका क्षेत्रात 15 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर

शिवसेनेनं हेही नमूद केलं आहे की, अंबरनाथमध्ये काँग्रेसने भाजपसोबत गेलेल्या नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई केली, पण प्रत्यक्षात ते सर्व नगरसेवक भाजपमध्येच दाखल झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे संपूर्ण चित्र राजकीय नैतिकतेच्या अधःपतनाचं असल्याचं सामनात म्हटलं आहे. भाजपच्या ध्येयधोरणांवरही अग्रलेखात कठोर टीका करण्यात आली आहे. सत्तेसाठी कुठल्याही स्तरावर जाणे हेच भाजपचे धोरण बनले असल्याचा आरोप करत, गुंड आणि भ्रष्ट नेत्यांना पक्षात सामावून घेणे हेच भाजपचे खरे अजेंडा असल्याचा दावा शिवसेनेनं केला आहे.

तसेच, भाजपने ‘काँग्रेसमुक्त भारत’चा नारा दिला असला, तरी प्रत्यक्षात भाजपच काँग्रेसयुक्त झाला आहे, अशी टीकाही करण्यात आली आहे. भाजपमधील बहुतांश लोकप्रतिनिधी हे इतर पक्षांतून आयात केलेले असल्याचा आरोप सामनात करण्यात आला आहे. एआयएमआयएमबाबत बोलताना शिवसेनेनं म्हटलं आहे की, निवडणुकांमध्ये मतांची फाळणी व्हावी यासाठी भाजपने ओवेसींची अप्रत्यक्ष मदत घेतली असून, आता हा लपलेला ‘रोमान्स’ उघडकीस आला आहे. सत्तेसाठी काहीही करण्याची भाजपची मानसिकता यामधून स्पष्ट होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अग्रलेखाच्या शेवटी शिवसेनेनं भाजपवर उपरोधिक शैलीत टीका करत, भाजपचे हिंदुत्व हे ढोंग असून सत्ता हाच त्यांचा खरा धर्म असल्याचा आरोप केला आहे.

follow us