Download App

Eknath Shinde : तब्बल 51 वर्षानंतर दोनशे आमदारांचा पाठिंबा मिळवणारे एकमेव मुख्यमंत्री

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांचं बंड आणि राज्य मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर महाराष्ट्रातील शिंदे सरकारला पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या आता 200 च्या वर पोहोचली आहे. दरम्यान, ही एक ऐतिहासिक गोष्ट असून गेल्या 51 वर्षांनंतर प्रथमच एखाद्या मुख्यमंत्र्यांच्या मागे 200 पेक्षा जास्त आमदारांचं पाठबळ आहे, असं विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं. यापूर्वी 1972 मध्ये राज्य सरकारला 200 हून अधिक आमदारांचा पाठिंबा मिळाला होता. फक्त त्यावेळी सभागृहाचे संख्याबळ 270 होते आणि सर्व 222 आमदार काँग्रेसचे होते. (Eknath Shinde become historical Chief Minister of Maharashtra who gets 200 MLA Support after join Ajit Pawar)

कसं आहे ऐतिहासिक गणित?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांची नेमकी संख्या अद्याप समजू शकलेली नाही. मात्र, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्याला 53 पैकी 36 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. तसंच अजित पवारांना आणखी आमदार पाठिंबा देत असून आम्ही अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसचा भाग आहोत. आम्ही पक्षांतर केलेला नाही, असाही दावा मिटकरी यांनी केला. मिटकरी यांचा 36 आमदारांच्या पाठिंब्याचा दावा बेरजेत धरल्यास, शिंदे सरकारला पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या 200 पेक्षा जास्त होते.

Shiv Sena : अजितदादांच्या एन्ट्रीनंतर शिंदेंच्या शिवसेनेला हादरे; आमदारांना परतीचे वेध

विधिमंडळात सध्या 288 पैकी भाजपचे 105 आमदार आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे 40 आमदार आहेत. आता राष्ट्रवादीचे 36 आमदारांचे पाठबळ शिंदेंना मिळाले आहे. याशिवाय शिंदे-फडणवीस सरकारला बहुजन विकास आघाडीच्या 3, प्रहार जनशक्ती पक्षाच्या 2 आणि रासप, जन सुराज्य पक्षाच्या प्रत्येकी एका आमदाराचा पाठिंबा आहे. याशिवाय 13 अपक्षांचाही शिंदे-फडणवीस यांच्या सरकारला पाठिंबा आहे. या सर्वांची बेरीज केल्यास सरकारला पाठिंबा देणाऱ्या आमदारांची एकत्रित संख्या 201 आहे.

Letsupp Special : मुख्यमंत्र्यांच्या मनात चाललंय काय? लवाजमा सोडून सामंत यांच्या केबिनमध्ये

दरम्यान, 1990 पासून, 288 सदस्यांच्या विधानसभेत एकाही राजकीय पक्षाला बहुमतासाठी लागणाऱ्या 145 जागा जिंकता आलेल्या नाहीत. 1972 मध्ये, सभागृहाचे एकूण संख्याबळ 270 असताना काँग्रेसने 222 जागा जिंकल्या होत्या. 1978 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सभागृहाचे संख्याबळ 288 झाले. 1980 मध्ये काँग्रेसला 186 आणि 1985 मध्ये 161 जागा मिळाल्या होत्या. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 122 जागा जिंकून प्रदीर्घ कालावधीनंतर भाजप स्वबळावर सरकार स्थापन करण्याच्या जवळ पोहचला होता. परंतु 2019 च्या निवडणुकीत भाजपला आपल्या कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. भाजपल 105 जागांवरच थांबला.

Tags

follow us