CM Eknath Shinde : दोन दिवसांपूर्वी अहमदनगरच्या (Ahmednagar) फकीरवाडा भागात संदल उरोसदरम्यान औरंगजेबाचे फोटो घेऊन काही युवक नाचत होते. हे प्रकरण ताजे असतानाच आता कोल्हापूरमध्येही काही तरुणांनी औरंगजेबचा संदर्भ देऊन आक्षेपार्ह पोस्ट ठेवल्यानं तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्याविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी आज कोल्हापूर बंदची (Kolhapur) हाक दिली होती. त्यानंतर आज मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले. काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. यामुळे पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला. या तणावाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहरात सध्या कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, कोल्हापुरातील परिस्थितीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाष्य केले आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. राज्य सरकार हे सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेणारे सरकार आहे. मी वैयक्तिकरित्या संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून परिस्थिती नियंत्रणात आहे. कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. कायदा हातात घेणाऱ्यांना पाठीशी घातलं जाणार नाही. कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही शासनाची जबाबदारी असल्याने सर्व नागरिकांचेही सहकार्य अपेक्षित आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची गृह विभाग काळजी घेत असून गृहराज्यमंत्रीही त्यावर लक्ष ठेवून आहेत, असं शिंदे म्हणाले.
Kolhapur Band : संभाजीराजे म्हणाले, दोषींवर इतकी कडक कारवाई करा, की…
कोल्हापुरातील या प्रकाराविषयी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली. ते म्हणाले, औरंगजेबाची स्तुती करणाऱ्यांना महाराष्ट्रात माफी नाही. जनतेने शांतता राखावी. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. तसंच कुणी चुकीचं वागत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याचे आणि तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आण्याचे, निर्देशही गृहविभागाने कोल्हापूर पोलिसांना दिले आहेत. यासोबत खबरदारी म्हणून इतर जिल्ह्यांवरही बारीक नजर ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, असं फडणवीस यांनी सांगितलं.
दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि तणावाच्या परिस्थितीमुळे कोल्हापुरात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. कोल्हापुरातील परिस्थिती नियंत्रणात आहे. जिल्ह्यात अफवांचं पेव फुटू नये म्हणून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे, असं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितलं.