अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचा घात होऊ शकतो; शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ

दत्तात्रय मगर यांनी रोहित पवार यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना केलेल्या विधानाने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Untitled Design 88

Untitled Design 88

Eknath Shinde could be targeted or face foul play : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीतील अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन दुसऱ्या दिवशी देखील सुरू असून, या आंदोलनाला राज्यभरातून वाढता पाठिंबा मिळत आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आंदोलनस्थळी भेट देत रोहित पवार यांच्चशी चर्चा करत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे पंचायत समिती सभापती दत्तात्रय मगर यांनी आंदोलनस्थळी भेट देत पाठिंबा जाहीर केल्याने राजकीय चर्चांना नवे वळण मिळाले आहे.

दत्तात्रय मगर यांनी रोहित पवार यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना केलेल्या विधानाने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मी सरकारमधील पदाधिकारी आहे. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजकारण होऊ नये. अजितदादांसोबत काय घडले, हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं आहे. शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून ओळखले जाणारे अजितदादा आपल्यामधून कसे दूर गेले, हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे आता रोहित पवार यांच्यासारख्या शेतकरी हितासाठी लढणाऱ्या नेतृत्वाला जपण्याची गरज आहे, असे मगर यांनी म्हटले.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत देखील सूचक भाष्य केलं. मला एकनाथ शिंदे साहेबांची खंत वाटते. अजितदादांप्रमाणेच त्यांचा देखील घात होऊ शकतो, अशी भीती वाटते. राज्यातील राजकारण वेगाने बदलत आहे. सत्तेतील समीकरणे कधीही बदलू शकतात. त्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या नेतृत्वाला मजबूत करण्याची आवश्यकता आहे, असे वक्तव्य त्यांनी केले.

आसाममध्ये भारतीय वायू दलाच्या AN-32 ला अपघात; विमानाचे दोन तुकडे, 5 जवान शहीद

मगर यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत समीकरणांबाबत प्रश्न उपस्थित केले जात असून, त्यांच्या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. विशेष म्हणजे शिंदे गटातील एका पदाधिकाऱ्याने विरोधी पक्षाच्या आमदाराच्या आंदोलनाला उघडपणे पाठिंबा देणे आणि त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत असे वक्तव्य करणे, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष वेधले गेले आहे.

दरम्यान, रोहित पवार यांचे अन्नत्याग आंदोलन शेतकरी कर्जमाफीतील अटी रद्द करण्याच्या मागणीवर केंद्रित आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या जाचक अटी न लावता कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी त्यांची मागणी आहे. आंदोलनस्थळी येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत असून, विविध संघटनांकडूनही समर्थन व्यक्त केले जात आहे.

पंढरपूरमध्ये सुरू असलेल्या या आंदोलनाला मिळणारा वाढता राजकीय पाठिंबा आणि त्यातून समोर येणारी वक्तव्ये यामुळे राज्याच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झाली आहे. आता सरकार या आंदोलनाची कितपत दखल घेते आणि शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version