15 परीक्षांचे पेपर फुटले…भाजप सरकार आल्यापासून… एमपीएससी पेपरफुटीबाबत रोहित पवारांचे गंभीर आरोप

Rohit Pawar यांनी केलेल्या आरोपांनंतर एमपीएससीऔषध निरीक्षक भरती परीक्षेच्या कथित पेपरफुटी प्रकरणात दररोज नवे दावे समोर येत आहेत.

Mpsc Rohit Pawar

Fifteen exam papers leaked, BJP government came to power Rohit Pawar serious allegations regarding MPSC paper leak : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षक भरती परीक्षेच्या कथित पेपरफुटी प्रकरणात दररोज नवे दावे समोर येत असून, या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांनंतर संबंधित प्रशिक्षण संस्थेच्या संचालकाशी संपर्क होत नसल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, तपासासाठी मुंबईतील विशेष पथक नंदुरबारमध्ये दाखल झाल्याची माहितीही समोर आली आहे. रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, या प्रकरणातील तक्रारदार आणि संबंधित उमेदवार विद्यार्थिनीला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहे. तसेच अधिक पुरावे हाती आल्यानंतर आणखी माहिती सार्वजनिक करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सीईटी परीक्षांबाबतही उपस्थित केले प्रश्न

रोहित पवार यांनी राज्यातील इतर स्पर्धा परीक्षांच्या प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, विविध भरती आणि प्रवेश परीक्षांबाबत सातत्याने गैरव्यवहाराच्या तक्रारी समोर येत आहेत. यामध्ये सीईटी परीक्षेचाही समावेश असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांनी आरोप केला की, या संदर्भातील माहिती आणि पुरावे संबंधित यंत्रणांकडे देण्यात आले असून, त्यावर निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षांवरील विद्यार्थ्यांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी संपूर्ण प्रक्रियेची सखोल तपासणी होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी म्हटले.

पुराव्यांचे फॉरेन्सिक ऑडिट व्हावे

एमपीएससी औषध निरीक्षक परीक्षेबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, काही उमेदवारांच्या गुणांबाबत संशय व्यक्त करण्यात आला असून, या प्रकरणातील डिजिटल पुराव्यांची फॉरेन्सिक तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. संबंधित व्यक्तींचे चॅट्स आणि अन्य इलेक्ट्रॉनिक नोंदी तपासल्याशिवाय संपूर्ण सत्य समोर येणार नाही, असा दावा त्यांनी केला. त्यांच्या मते, तपास पारदर्शक पद्धतीने झाला पाहिजे आणि कोणालाही संरक्षण मिळता कामा नये. स्पर्धा परीक्षा प्रक्रियेत आर्थिक व्यवहार किंवा गैरप्रकार झाल्यास त्याचा थेट परिणाम गुणवंत विद्यार्थ्यांवर होतो, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.

या प्रकरणावर बोलताना रोहित पवार यांनी हा मुद्दा राजकीय नसून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असल्याचे सांगितले. एमपीएससीसारख्या महत्त्वाच्या संस्थेची विश्वासार्हता टिकवण्यासाठी निष्पक्ष तपास आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच ते म्हणाले की, ज्या राज्यात भाजपचं सरकार नाही तेथील पेपरफुटी विरोधात भाजपकडून आंदोलन सुरू आहे. पण त्यांनी त्यांच्याच महाराष्ट्र सरकार विरूद्ध तआंदोलन करणं फार महत्त्वाचं आहे. कारण भाजप सरकार आल्यापासून अनेक पेपर फुटले. त्यात राज्यात 15 परीक्षांचे पेपर फुटले आहेत.

सीजेपी आंदोलनातील गुन्ह्यांवरही भूमिका

दिल्लीतील सीजेपी आंदोलनानंतर आंदोलकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. पोलिस महासंचालकांची भेट घेऊन आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने गुन्हे दाखल झाल्याचा उल्लेख करत त्यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन केले.

शरद पवार एनडीएसोबत जाणार नाहीत

राजकीय घडामोडींवर भाष्य करताना रोहित पवार यांनी शरद पवार यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याचे सांगितले. तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशीही चर्चा केल्याचे त्यांनी नमूद केले. एनडीएत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम देत त्यांनी स्पष्ट केले की, शरद पवार एनडीएत सहभागी होणार नाहीत. आपणही आपल्या राजकीय भूमिकेवर ठाम असून, जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

follow us