Download App

मोठी बातमी! आज महाराष्ट्र-झारखंड निवडणुकीची घोषणा; दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

केंद्रीय निवडणूक आयोग आज दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Elections 2024 : राज्याच्या विधानसभा निवडणुकीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आज दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद घेणा आहे. या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र आणि झारखंड राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करतील अशी शक्यता आहे. आयोगाने या निवडणुकांची तयारी पूर्ण केली आहे. यानंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.

झारखंडमध्ये तीन तर महाराष्ट्रात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका? ‘या’ दिवशी होणार घोषणा

महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ येत्या 26 नोव्हेंबरला संपणार आहे. याआधीच निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे आहे. झारखंड विधानसभेचा कार्यकाळही 5 जानेवारी 2025 ला संपणार आहे. या राज्याच्या निवडणुकीचीही घोषणा आजच होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त 50 जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा आज होण्याची शक्यता आहे.

यामध्ये वायनाड मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघात काँग्रेस नेते राहुल गांधी विजयी झाले. त्याचवेळी अमेठीतही विजयी झाले होते. नियमानुसार त्यांना एका खासदारकीचा राजीनामा देणे गरजेचे होते. त्यामुळे त्यांनी वायनाड खासदारकीचा राजीनामा दिला होता. काँग्रेसने या मतदारसंघात प्रियांका गांधी वाड्रा यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.

महाराष्ट्रात महायुतीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार सहभागी आहेत. महायुतीचा सामना महाविकास आघाडीशी होणार आहे. या आघाडीत शरद पवार गट, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट सहभागी आहेत. या दोन्ही आघाड्यांतील राजकीय पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. जागावाटपाच्या चर्चा आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत. निवडणूक आयोागकडून निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर या राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या लवकरच जाहीर होतील अशी शक्यता आहे.

निवडणूक आयोगाने हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुकांची घोषणा केली त्याचवेळी महाराष्ट्रातील निवडणुकीची घोषणा होईल असे सांगितले जात होते. परंतु, आयोगाने त्यावेळी घोषणा केली नाही. याआधी कमीत कमी तीन वेळा महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणुका सोबत झाल्या होत्या. यंदा मात्र निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या निवडणुका मागे ठेवल्या होत्या. आज या निवडणुकांची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.

मोठी बातमी! अखेर राज्यपाल नियुक्त आमदारांचा तिढा सुटला; आजच शपथविधी, महायुतीकडून कुणाची वर्णी?

मागील वेळी किती टप्प्यात निवडणुका?

झारखंड राज्यात झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) इंडिया आघाडीचा घटक आहे. तर एनडीए आघाडीत भाजप, ऑल झारखंड स्टुडेंट्स यूनियन (आजसू) आणि जनता दल (युनायटेड) यांचा सहभाग आहे. 2019 मधील विधानसभा निवडणुका एकाच टप्प्यात झाल्या होत्या. 21 ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते. त्यानंतर 24 ऑक्टोबरला निकाल घोषित करण्यात आले होते. झारखंड विधानसभा निवडणूक पाच टप्प्यात झाली होती. पहिला टप्पा 30 नोव्हेंबर, दुसरा 7 डिसेंबर, तिसरा 12 डिसेंबर, चौथा 16 डिसेंबर आणि पाचव्या टप्प्यातील मतदान 20 डिसेंबर रोजी झाले होते. त्यानंतर 23 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात आले होते.

follow us