शाई पुसून पुन्हा मतदान करता येणं शक्य नाही, राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण

Maharashtra Election Commission : बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हे

  • Written By: Published:
Maharashtra Election Commission

Maharashtra Election Commission : बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हे गैरकृत्य आहे. त्याचबरोबर बोटावरची शाई पुसून एखादी व्यक्ती पुन्हा मतदान करण्यासाठी आल्याचे आढळल्यास त्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने केले आहे. बोटावरची शाई पुसून कोणी गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला तरी संबंधित मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही, याबाबतची दक्षता यापूर्वीच घेण्यात आली आहे.

मतदाराने मतदान केल्यानंतर त्याबाबत नोंद घेण्यात आलेली असते. त्यामुळे केवळ शाई पुसून गैरकृत्य केलेल्या मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही. याबाबत सतर्कता बाळगण्याच्या सूचना पुन्हा एकदा सर्व संबंधिताना देण्यात आल्या आहेत. मतदाराच्या बोटाला शाई लावण्याकरिता मार्कर पेनच्या वापराबाबत राज्य निवडणूक आयोगाने 19 नोव्हेंबर 2011 रोजी आणि 28 नोव्हेंबर 2011 रोजी आदेश निर्गमित केले आहेत. तेव्हापासून स्थानिक स्वराज्‍य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदाराच्या बोटाला शाई लावण्यासाठी मार्कर पेनचा वापर केला जात आहे.

या आदेशानुसार मतदाराच्या बोटावर ठळकपणे उमटेल, अशा पद्धतीने मार्कर पेनने शाई लावण्यात यावी तसेच नखावर आणि नखाच्या वरच्या बाजुला त्वचेवर तीन- चार वेळा घासून शाई लावावी, अशा सूचना यापूर्वीदेखील देण्यात आल्या असून आणि त्या मार्कर पेनवरही नमूद केल्या आहेत. त्यामुळे शाई पुसण्याचा प्रयत्न करण्याचे गैरकृत्य करू नये, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.

सत्ताधाऱ्यांना निवडून आणण्यासाठी यंत्रणा कामाला लागली; राज ठाकरे संतापले –

मुंबईसह कल्याण डोंबिवली महाापालिकेत मतदारांच्या बोटाला लावण्यात आलेली शाई पुसली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबत काही व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने विरोधक राज्य निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल करत आहे. तर आता राज्य निवडणूक आयोगाने यावर स्पष्टीकरण देत बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असं सांगण्यात आले आहे.

follow us