Maharashtra Elections : राज्यात आता विधानसभा निवडणुकीची तयारी (Maharashtra Elections) राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत चांगलं (Lok Sabha Election) यश मिळाल्याने महाविकास आघाडी जोमात आहे. तर दुसरीकडे महायुतीकडून पराभवाचं मंथन केलं जात आहे. विधानसभेत याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी काळजी घेतली जात आहे. महायुतीत खटके उडणार नाहीत याची काळजी घ्या, अशा सूचना पक्षश्रेष्ठींनी आधीच दिल्या आहेत. त्यानुसार महायुतीच्या नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. लोकसभा निवडणुकीत ज्या चुका झाल्या त्या पुन्हा होणार नाहीत याची काळजी घेतली जात आहे. जागावाटप लवकरात लवकर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
विधानसभेआधीच काडी! भाजपाच्या बैठकीत शिंदे-राष्ट्रवादी विरोधी सूर; मविआतही धुसफूस?
लोकसभा निवडणुकीत जागावाटप आणि उमेदवारांची घोषणा होण्यास बराच उशीर झाला. त्यामुळे उमेदवारांना प्रचारास पुरेसा वेळ मिळाला नाही. अशी परिस्थिती विधानसभा निवडणुकीत होऊ नये. जागावाटप आणि उमेदवारांची घोषणा लवकर व्हावी अशी आग्रही मागणी दोन दिवसांपूर्वी झालेल्या भाजप नेत्यांच्या बैठकीतही करण्यात आली होती. त्यानुसार कार्यवाही केली जात आहे. लोकसभे प्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याची रणनीती भाजपकडून आखली जात आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप 155 ते 160 जागा लढवण्याच्या विचारात आहे. कोणत्याही परिस्थितीत 155 पेक्षा कमी जागा घ्यायच्या नाहीत असंच भाजपाचं ठरलेलं दिसत आहे. एकनाथ शिंदे 100 ते 110 आणि अजित पवार राष्ट्रवादी 80 ते 90 जागांच्या तयारीत आहे. त्यामुळे या निवडणुकीतही जागावाटपात रस्सीखेच दिसून येणार आहे. त्यामुळे जागावाटपात धुसफूस होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लोकसभा उपाध्यक्षपदासाठी इंडिया आघाडीचे अयोध्या कार्ड ? सपाच्या ‘या’ नेत्याचे नाव आघाडीवर
आजमितीस विधानसभेत भाजपाचे 105 आमदार आहेत. काही आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे हा आकडा 115 पर्यंत पोहोचतो. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबरोबर 40 आमदार आहेत. तर अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबरोबर 39 आमदार आहेत. त्यामुळे या जागा पुन्हा मिळाव्यात अशी घटकपक्षांची मागणी आहे. या जागांवर विद्यमान आमदारांनाच तिकीट देणार की नव्या चेहऱ्यांना संधी देणार याचा निर्णय अजून झालेला नाही. हा निर्णय संबंधित पक्षाचा असेल. परंतु, 155 ते 160 दरम्यान जागा लढवण्याची तयारी राज्यातील भाजप नेत्यांची आहे. यामध्ये कोणतीच तडजोड केली जाणार नाही असे या नेत्यांनी दिल्लीतील नेत्यांना कळवलं आहे.
अशा परिस्थितीत जागावाटपात वादच जास्त होण्याची चिन्हे दिसत आहेत. लोकसभेचीच पुनरावृत्ती जागावाटपात होईल का असा प्रश्न विचारला जात आहे. जागावाटपाचे जटील आव्हान पेलवून महायुतीतील सर्वच घटक पक्षांना सन्मानजनक जागा देण्याची कसरत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना आगामी काळात करावी लागणार आहे एवढे मात्र नक्की आहे.