विधानसभेआधीच काडी! भाजपाच्या बैठकीत शिंदे-राष्ट्रवादी विरोधी सूर; मविआतही धुसफूस?
Maharashtra Elections 2024 : राज्यात आता विधानसभा निवडणुकीची तयारी (Maharashtra Elections) राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत चांगलं (Lok Sabha Election) यश मिळाल्याने महाविकास आघाडी जोमात आहे. तर दुसरीकडे महायुतीकडून पराभवाचं मंथन केलं जात आहे. विधानसभेत याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी काळजी घेतली जात आहे. महायुतीत खटके उडणार नाहीत याची काळजी घ्या, अशा सूचना पक्षश्रेष्ठींनी आधीच दिल्या आहेत. मात्र या नुसार कार्यवाही होताना अजून तरी दिसत नाही. काल भारतीय जनता पार्टीच्या (BJP) उच्चस्तरीय बैठकीत तर शिंदे सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी (Ajit Pawar NCP) विरोधात तक्रारींचा पाऊसच पडला.
या दोन्ही पक्षांतील नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी काम केलं नाही. महाविकास आघाडीसाठी काम केलं अशा तक्रारी या बैठकीत करण्यात आल्या, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. लोकसभा निवडणुकीत जागावाटप आणि उमेदवारांची घोषणा होण्यास बराच उशीर झाला. त्यामुळे उमेदवारांना प्रचारास पुरेसा वेळ मिळाला नाही. अशी परिस्थिती विधानसभा निवडणुकीत होऊ नये. जागावाटप आणि उमेदवारांची घोषणा लवकर व्हावी अशी मागणी या बैठकीत करण्यात आली.
..तर विधानसभा लढणार नाही, महायुतीला जागा देणार, आमदार बच्चू कडूंची मोठी घोषणा
बैठकीत मात्र भाजप नेत्यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी विरोधात कोणत्याही तक्रारी केल्या नाहीत. महायुतीत वाद निर्माण करण्यासाठी असा अपप्रचार केला जात आहे, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या बैठकीसाठी भाजपाचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, सहप्रभारी अश्विनी वैष्णव, सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आदी उपस्थित होते.
या बैठकीत राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघांत महायुतीच्या उमेदवाराला किती मते मिळाली. कोणत्या अडचणी जाणवल्या, येथील आमदार आणि पदाधिकाऱ्यांची भूमिका काय होती, या नेत्यांनी महायुतीच्या उमेदवाराचे काम केले किंवा नाही या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळाली.
भाजप नेत्यांचा विरोधी सूर?
लोकसभा निवडणुकीत अजित पवार आणि शिंदे गटाने महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार केला नाही. योग्य प्रकारे काम केले नाही. त्यामुळे मोठा फटका बसला. दिंडोरी, सातारा, पुणे, सांगली, सोलापूर, बुलढाणा मतदारसंघात अजित पवार गटामुळे तर जालना आणि पालघर मतदारसंघात शिंदे गटातील नेत्यांमुळे फटका बसल्याचा आरोप या बैठकीत करण्यात आला. या समस्येवर तत्काळ तोडगा निघाला नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीतही वाद होऊन महायुतीला फटका बसण्याची भीती भाजप नेत्यांनी या बैठकीत व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
“मी मारलेले ओरखडे अनेकदा दिसत नाहीत” वाघनखांवरून मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल
मविआतही धुसफूस, ठाकरेंना विरोध ?
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं. तिन्ही पक्षांच्या मिळून 31 जागा निवडून आल्या. यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 8, काँग्रेसला 14 आणि उद्धव ठाकरे गटाला 9 जागा मिळाल्या. काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला. आता या तिन्ही पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पण, या निवडणुकीआधीच असे काही प्रसंग घडत आहेत ज्यामुळे धुसफूस उघड होत आहे. विधानसभेत उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करण्यास ठाकरे गटाने सुरुवात केली आहे. याबाबत जेव्हा शरद पवारांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी महाविकास आघाडीचा हाच चेहरा असेल असे सांगितले होते.
त्यानंतर काल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही असाच सूर आळवण्यात आला. उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर विधानसभा निवडणूक लढण्यास काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. मुंबईत झालेल्या बैठकीत काँग्रेसचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस केसी वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या उपस्थितीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. आता महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांचा विरोधी आवाज आल्याने यावर ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया दिली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.