सुनील तटकरेंचा सख्खा मेव्हणा रामदास कदमांना पुरून उरला… योगेश कदमांसमोर नवं आव्हान
बिरवटकर यांनी निवडणुकीत विद्यमान गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे समर्थक रवींद्र रेवाळ यांचा पराभव करत विजयी पताका फडकवली आहे.
रामदास कदम शिवसेनेचा आक्रमक चेहरा जो आजही अधूनमधून डरकाळी फोडत भल्याभल्यांना घाम फोडतो. पण याच आक्रमक कदमांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचे सख्खे मेव्हणे भडगाव जिल्हा परिषदेत चांगलेच पुरून उरले आहेत. अवघ्या एका दिवसापूर्वी म्हणजे सोमवारी राज्यातील 12 जिल्हा परिषदांचा निकाल लागला. यात रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भडगाव जिल्हा परिषद चांगलीच चर्चेत होती. कारण येथून सुनील तटकरेंचे सख्खे मेव्हणे अजय बिरवटकर निवडणुकीच्या मैदानात होते. बिरवटकर हे तटकरेंचे मेव्हणे असल्याने या जागेचा निकाल तटकरेंसाठी ‘इभ्रतीचा प्रश्न’ झाला होता. अखेर बिरवटकर यांनी निवडणुकीत विद्यमान गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे समर्थक रवींद्र रेवाळ यांचा पराभव करत विजयी पताका फडकवली आहे.
मोठे मोठे गार केले गंम्मतमध्ये… राजन पाटलांच्या खेळीने उमेश पाटलांना पराभवाचा धडा!
राजकीय परिणाम काय?
रामदास कदम यांच्या राजकारणाचा आणि कुटुंबाचा प्रभाव खेड व कोकण भागात महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे भडगाव गटातील हा निकाल आगामी राजकीय समीकरणांसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. तर, कदम कुटुंबाच्या प्रभाव असलेल्या भागात राष्ट्रवादीला मिळालेला विजय तटकरे गटासाठी बळकटी देणारा ठरला आहे. त्यामुळे भडगाव गटातील हा निकाल आगामी राजकीय समीकरणांसाठी महत्त्वाचा मानला जात आहे.
खेड तालुक्यातील भडगाव गटात रामदास कदम आणि त्यांचे पुत्र आमदार योगेश कदम यांची मोठी ताकद मानली जाते. अशा बालेकिल्ल्यात तटकरे यांच्या मेव्हण्यांनी विजय मिळवणे, हा कदम कुटुंबासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. यापूर्वी या भागात कदम कुटुंबाचे एकतर्फी वर्चस्व होते. मात्र, अजय बिरवटकर यांनी शिवसेनेच्या (शिंदे गट) रवींद्र रेवाळ यांचा पराभव करून या गडाला मोठे खिंडार पाडले आहे.
Khed Politics : बाबाजी काळे, अख्ख्या राज्यात एकहाती सत्ता मिळवणारा ठाकरेंचा वाघ
महायुतीमधील ‘फ्रेंडली फाईट’चे परिणाम
जरी राज्यात भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची महायुती असली, तरी रत्नागिरीत अनेक ठिकाणी या पक्षांनी एकमेकांविरुद्ध उमेदवार उभे केले होते. यावरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर असलेले मतभेद आणि वर्चस्वाची स्पर्धा स्पष्ट झाली आहे.
निकालाचे दूरगामी परिणाम
भडगवा गटातील या विजयामुळे खेड-दापोली विधानसभा मतदारसंघात सुनील तटकरे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव येत्या काळात वाढण्याची शक्यता असून, हा प्रभाव आगामी विधानसभा निवडणुकीत जागावाटपाच्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस खेड-दापोली परिसरातील जागांवर अधिक दावा सांगू शकते, जे योगेश कदम यांच्यासाठी चिंतेचे ठरू शकते. भडगाव गटातील हा निकाल कोकणातील स्थानिक सत्तासंघर्षाला एक नवी दिशा देणारा ठरेल का? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
