CET Cell : एमएचटी-सीईटी (MHT-CET) परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (CET Cell) ने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी बी.ई., बी.टेक. तसेच पाच वर्षांच्या इंटिग्रेटेड मास्टर ऑफ इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला (CAP) अधिकृत सुरुवात केली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना २ जुलै ते १२ जुलै या कालावधीत ऑनलाइन नोंदणी करता येणार असून, प्रवेश प्रक्रियेचे संपूर्ण वेळापत्रक सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
प्रवेश अर्जासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १,३०० रुपये, तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १,००० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. अर्ज भरल्यानंतर विद्यार्थ्यांना ३ जुलै ते १३ जुलै या कालावधीत कागदपत्रांची पडताळणी आणि अर्जाची ऑनलाइन पुष्टी (Confirmation) करण्याची संधी असेल. विद्यार्थी ई-स्क्रुटिनी किंवा प्रत्यक्ष स्क्रुटिनी केंद्रात जाऊन कागदपत्रांची पडताळणी करू शकतात.
प्रवेश प्रक्रियेतील पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे गुणवत्ता यादी. १५ जुलै रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. या यादीत काही त्रुटी असल्यास विद्यार्थ्यांना १६ ते १८ जुलै दरम्यान हरकती नोंदवता येतील. सर्व हरकतींची छाननी झाल्यानंतर २० जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर पर्याय नोंदणी (Option Form) आणि सीट वाटपाच्या पुढील टप्प्यांचे वेळापत्रक जाहीर होईल. यंदा प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून कागदपत्र पडताळणीची सुविधा शनिवार आणि रविवारही सुरू ठेवण्यात आली आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५.३० या वेळेत विद्यार्थी स्क्रुटिनी केंद्रात जाऊन किंवा निवडलेल्या पद्धतीनुसार पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करू शकतील.
ठाकरेंच्या 6 खासदारांसाठी भाजपची दारं बंद का? ‘ऑपरेशन टायगर’ वर CM फडणवीसांचा सर्वात मोठा खुलासा
दरम्यान, यावर्षी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना दोन वेळा सीईटी परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आपले गुण सुधारण्याची संधी मिळवली. आता प्रवेश प्रक्रियेलाही सुरुवात झाल्याने विद्यार्थ्यांनी अर्ज भरणे, कागदपत्रे अपलोड करणे आणि पडताळणीची प्रक्रिया शेवटच्या दिवसाची वाट न पाहता वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन सीईटी सेलकडून करण्यात आले आहे.
