Ravikant Tupkar : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा (Swabhimani Shetkari sangathana) प्रमुख आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जाणारे रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्यावर पक्ष संघटनेने मोठी कारवाई केली आहे. तुपकर यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील (Jalinder Patil)यांनी तुपकर यांच्या हकालपट्टीची घोषणा केली आहे.
राजू शेट्टींवह आरोप करणारे तुपकर यांच्या विरोधात निर्णय घेण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या सदस्यांनी तुपकर यांच्या हकालपट्टीचा निर्णय घेतला. दरम्यान, या समितीने सोमवारी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलतांना जालिंदर पाटील म्हणाले की, तुपकर हे ३-४ वर्षांपासून संघटनेच्या एकाही आंदोलनाला आले नाहीत. उलटपक्ष त्यांनी स्वत:चा टीआरपी वाढवण्यासाठी पक्षश्रेष्ठींवर बेछुट आरोप केले. यामुळे यापुढे शेतकरी संघटना आणि तुपकर यांचा कोणताही संबंध नसल्याचे नाही.
Government Schemes : राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?
पुढं बोलतांना पाटील म्हणाले की, रविकांत तुपकर यांची नुकतीच पुण्यात बैठक झाली. ही बैठक घेताना त्यांनी पक्षप्रमुख राजू शेट्टी यांना विश्वासात घेतले नाही. ही संघटना माझीच आहे, अशाप्रकारे ते वागत आहेत, असंही पाटील म्हणाले.
आता शेतकरी संघटना आणि रवींद्र तुपकर यांच्यातील संबंध संपलेला आहे. तुपकर यांनी आजवर आपल्यासोबत खांद्याला खांदा लावून लढा दिला आहे. त्यामुळे आम्ही त्यांची हकालपट्टी केली असे म्हणणार नाही. मात्र ते स्वतःचा सुभा करत असताना त्यांच्या गळ्यात आमचे मंगळसूत्र कशाला हवे, असा सवाल जालिंदर पाटील यांनी केला.
रविकांत तुपकर यांना युवा नेते म्हणून पक्षाने अनेक पदे दिली. पक्षाचा पहिला लाल दिवा त्यांना दिला. पण 2019 च्या निवडणुकीत ते कोणतेही कारण न देता पक्ष सोडून गेले. महिनाभरानंतर ते पक्षात परतले. त्यांना कोणतेही महत्त्वाचे पद तातडीने दिले जाणार नसल्याचे सांगण्यात आले. मात्र ते सातत्याने पक्ष नेतृत्वावर टीका करत आहेत. त्यांना पक्षाच्या शिस्तपालन समितीसमोर बोलावण्यात आले. पण ते आले नाहीत, असंही जालिंदर पाटील म्हणाले.