Khokya Bhosale : मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी चांगलीच चर्चेत आली आहे. अशातच सतीश उर्फ खोक्या भोसले (Khokya Bhosale) नावाच्या एका आरोपीचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. आता त्यापाठोपाठ त्याचा साडू प्रशांत अरफान चव्हाण उर्फ गब्या याच्या विरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात (Pathardi Police Station) खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तू मला ओळखत नाही, मी कोण आहे? ते तुला सांगतो, मी सतीश ऊर्फ खोक्या भोसले (शिरुर कासार) याचा साडू आहे. तुला या जमिनीमध्ये यायचे असेल तर तुला एक कोटीची किंमत मोजावी लागेल, असे म्हणून खंडणी मागणारा खोक्याचा साडू प्रशांत चव्हाणच्या विरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खंडणी प्रकरणी आजीनाथ सावळेराम खेडकर (वय 47 रा. चिंचपुर इजदे, ता. पाथर्डी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत अरफान चव्हाण ऊर्फ गब्या, शिल्पा प्रशांत चव्हाण, सुनीता संजय भोसले, इंदुबाई आबाशा चव्हाण, शिल्पा अमोल काळे, संतोष आब्बास चव्हाण, काजल भाऊरस काळे, अनिता निस्तान काळे (सर्व रा. निपानी जळगाव, ता. पाथर्डी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
शेवगाव रस्त्यावर 1 जानेवारी 2025 रोजी आजिनाथ सावळेराम खेडकर व विष्णु बाबासाहेब ढाकणे यांनी 23 गुंठे जमीन खरेदी केली होती. सातबारा उतार्यावर नोंद झाल्यानंतर जागेचा ताबा घेण्यासाठी तेथे पोहोचले असता, प्रशांत चव्हाण व त्याच्या साथीदारांनी त्यांना अडवले आणि एक कोटी रुपयांची खंडणी मागितली. मी सतीश उर्फ खोक्या भोसले याचा साडू आहे.
कसब्यात एक म्यान मे दो तलवार…, रासने-धंगेकरांच्या संघर्षाचा दुसरा अंक…
तुम्ही घेतलेल्या जमिनीवर ताबा मिळवायचा असेल, तर एक कोटी रुपये द्या, असे फिर्यादीत नमूद आहे. तसेच जर पैसे दिले नाहीत, तर तुमच्यावर विनयभंग, बलात्कार आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. या घटनेची माहिती फिर्यादीने अर्जुन धायतडक व गहिनीनाथ शिरसाठ यांना दिली.