मुंबई : शेतकऱ्यांसाठी (Farmer) एक महत्वाची माहिती समोर आली आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठीच्या काही जाचक अटी यापूर्वी होत्या. मात्र आता बळीराजाची या जाचक अटीतून मुक्तता होणार आहे. बँकांना यापुढे शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना सिबिल स्कोरची अट लावता येणार नाही. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणं सोपं होणार आहे.
बळीराजा हा नेहमी अवकाळी पाऊस, दुष्काळ, अतिवृष्टी यामुळे समस्यांच्या वेढ्यात अडकलेला असायचा. या संकटाचा सामना करण्यासाठी व पिकांसाठी शेतकरी बँकेतून पीक कर्ज घेतात. मात्र, त्याचा भरणा वेळेवर होत नाही आणि त्याचा परिणाम पुढच्या वेळी त्याला बँक कर्ज देत नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत येतो.
मात्र आता बळीराजासाठी सुखद घटना घडली आहे. राष्ट्रीयकृत बॅंकांनी पीक कर्जासाठी ‘सिबिल’ अथवा ‘सिबिल स्कोअर’चे बंधन घालू नये. रिझर्व्ह बॅंकेच्या निर्देशात त्यासंबंधीचे कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बॅंकांनी सिबिल स्कोअरची अट न लावता शेतकऱ्यांना पीककर्ज द्यावे, असे पत्र सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीला पाठवले आहे.
सीबिल स्कोअर म्हणजे काय? जाणून घ्या
सिबिल स्कोर हा 300 ते 900 मध्ये गणला जातो. सिबिल स्कोर क्रेडिट हिस्टरीची माहिती दर्शवतो. 300 स्कोर हा अतिशय कमी मानला जातो तर 900 स्कोर असेल तर तो चांगला गणला जातो. 900 स्कोअर असलेले ग्राहक कर्जाची परतफेड करू शकतात अशे मानले जाते. बँकिंग आणि वित्तीय संस्थांमध्ये हा सिबिल स्कोर महत्त्वाचा मानला जातो.