मुंबई : महाराष्ट्रात संत तुकाराम महाराजांच्या माझ्या वक्तव्याला विचित्र स्वरुप दिलं जात असून मी केलेल्या वक्तव्याबद्दल हात जोडून जाहीरपणे माफी मागत असल्याचं बागेश्वर धामचे बागेश्वर बाबांनी(Bageshwar baba) स्पष्ट केलंय. काही दिवसांपूर्वी बागेश्वर महाराजांनी जळगावात संत तुकाराम महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं.
बागेश्वर महाराज म्हणाले, संत तुकाराम महाराजांबद्दल मी केलेल्या वक्तव्याचं विचित्रीकरण सुरु असून संत तुकाराम महाराजांची पत्नी त्यांना मारहाण करीत होती म्हणून संत तुकाराम महाराजांनी देवाचा धावा केला होता, असं मी माझ्या शैलीत सांगण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांनी सांगितलंय.
मात्र, माझ्या या वक्तव्यावर महाराष्ट्रातील काही पंथाच्या लोकांच्या भावना दुखावल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे मी माझे शब्द मागे घेत असून माझ्या वक्तव्याबद्दल मी जाहीरपणे माफी मागत असल्याचं ते म्हणाले आहेत.
तसेच संत तुकाराम महाराजांबद्दल माझ्या मनात कृतज्ञता असून संत तुकाराम महाराज नकारात्मकेमध्ये सकारात्मक शोधत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, वक्तव्यानंतर राज्यभरातून अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या.
सामाजिक संघटनांसह विविध पक्षांनी निषेध नोंदवला होता. तसेच बागेश्वर महाराजांनी तत्काळ माफी मागण्याची मागणी भाजपच्या अध्यात्मिक आघाडीच्यावतीने करण्यात आली होती. अखेर बागेश्वर बाबांनी आपला माफीनाम्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
दरम्यान, अंनिसच्या आरोपांमुळे चर्चेत असलेले बागेश्वर बाबा त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले. बागेश्वर बाबा अंधश्रध्दा पसरवित असल्याचा आरोप अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनी केला होता. त्यांनी पोलिसांत तक्रारही दाखल केली होती.
पोलिसांच्या तपासाअंती बागेश्वर बाबांनी क्लीनचीट मिळाल्यानंतर लगेचच त्यांनी जळगावातील कार्यक्रमात संत तुकाराम महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. अखेर बागेश्वर बाबांनी माफी मागितली असून माझे शब्द मी मागे घेत असल्याचं स्पष्ट केलंय.