महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने २४ ते २७ जुलै २०२६ या (Food) कालावधीत राज्यभर राबविलेल्या विशेष तपासणी मोहिमेत मोठी कारवाई केली आहे. अन्न सुरक्षा व स्वच्छता नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबईतील पाच नामांकित क्लबांचे एफएसएसएआय (FSSAI) परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत. तसेच राज्यभरात विविध कारवायांमध्ये एकूण १ कोटी ४ लाख ६३ हजार ३०५ रुपयांचा अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून ३५ धाडी टाकण्यात आल्या.
अन्न व औषध प्रशासनाच्या माहितीनुसार, मुंबईतील The Cricket Club of India, RK Juhu Gymkhana, The Aparna Juhu Gymkhana, MIG Cricket Club (Bandra East) आणि The Willingdon Sports Club येथे तपासणीदरम्यान गंभीर त्रुटी आढळल्या. स्वयंपाकघरातील अस्वच्छता, झुरळे व माशांचा प्रादुर्भाव, बुरशी लागलेले खाद्यपदार्थ, कच्चे व शिजवलेले अन्न एकत्र ठेवणे, तापमान नियंत्रणातील त्रुटी, कर्मचाऱ्यांकडून हातमोजे व सुरक्षा साधनांचा वापर न करणे, तसेच एफएसएसएआय नियमांचे उल्लंघन झाल्याने या संस्थांचे परवाने तातडीने निलंबित करण्यात आले.
डोनाल्ड ट्रम्प नाहीतर चीनमुळे कोरियाच्या शेअर बाजारात भूकंप ! कोस्पीत तब्बल 11 टक्के घसरण
याशिवाय मुंबईतील पूर्णिमा रेस्टॉरंट तसेच पालघरमधील एका केटरिंग संस्थेवरही कारवाई करून त्यांचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले. पुणे विभागात सातारा व सांगली जिल्ह्यातील पाच हॉटेले, रेस्टॉरंट आणि कँटीनचे परवानेही निलंबित करण्यात आले आहेत. त्याचबोरबर दूध व दुग्धजन्य पदार्थांवरील विशेष मोहिमेत सातारा जिल्ह्यात कृत्रिम दूध तयार केल्याप्रकरणी कारवाई करून साहित्य जप्त करण्यात आले. तर नाशिकमध्ये दूध संकलन केंद्रातून २०० लिटर गायीचे दूध जप्त करण्यात आले. या कारवाईत एकूण २०५ लिटर दूध व दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत सुमारे ₹८,६९६ आहे.
प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व तत्सम पदार्थांविरोधातही राज्यभर विशेष मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत १८ एफआयआर, २२ जणांना अटक आणि सुमारे ₹४६.५१ लाख किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला. याशिवाय इतर अन्नपदार्थांवरील कारवाईत २१,४३४.९३ किलो अन्नसाठा, तर सुमारे ₹५८.०३ लाख किमतीचा माल जप्त करण्यात आला.
राज्यभरात एकूण ५७ हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे व इतर अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १२ आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या, ११ अन्न आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले, तर एका आस्थापनाला व्यवसाय बंद करण्याची नोटीस देण्यात आली आहे.
प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या १९ आस्थापनांची तपासणी करून १९ ठिकाणी कारवाई करण्यात आली. सुमारे ₹४६.५९ लाखांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला. यासोबतच १८ एफआयआर दाखल करण्यात आले, २२ जणांना अटक करण्यात आली, ७ आस्थापने सील करण्यात आली आणि ₹२१ लाख किमतीची ३ वाहने जप्त करण्यात आली.
याशिवाय दूध, दुग्धजन्य पदार्थ, बेकरी उत्पादने आणि खाद्यतेल आदींच्या तपासणीत १६ आस्थापनांवर कारवाई करून २१,४३४.१३ किलो संशयित अन्नसाठा जप्त करण्यात आला. या साठ्याची अंदाजे किंमत ₹५८.०४ लाख इतकी आहे. हॉटेल, रेस्टॉरंट आणि धाब्यांवरही विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. राज्यभरातील ८१ आस्थापनांची तपासणी करून १२ सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या, तर ११ अन्न परवाने निलंबित करण्यात आले.
विशेष कारवाईत नागपूरमधील एका खाद्यपदार्थ उत्पादकाकडून कृत्रिम रंग वापरून तयार करण्यात येणाऱ्या शेव आणि तांदळाचे पीठ जप्त करण्यात आले. तसेच हिंगोली येथे सैल स्वरूपात विक्रीस ठेवलेली ३ किलो ताजी शेंगदाणा चटणी जप्त करण्यात आली. या सर्व नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी सुरू असून अहवालानुसार अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रशासनाने नागरिकांना संशयास्पद अन्नपदार्थ आढळल्यास त्वरित तक्रार नोंदवण्याचे आवाहन केले असून भेसळ करणाऱ्यांविरुद्ध अशी कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचा इशाराही दिला आहे.
