Download App

साधा शिवसैनिक, सिव्हिल इंजिनिअर ते शिवसेनेचा पहिला CM; जोशींचं राजकारण बाळासाहेबांनी घडवलं

Manohar Joshi : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे (Manohar Joshi) आज निधन झाले. काल त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. त्यानंतर आज पहाटे तीन वाजता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मनोहर जोशी यांच्या जाण्याने एक कट्टर आणि बाळासाहेबांच्या मुशीत (Balasaheb Thackeray) घडलेला नेता काळाच्या पडद्याआड गेला. अगदी सामान्य शिवसैनिक ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, लोकसभेचे अध्यक्ष अशी त्यांची राजकीय कारकिर्द राहिली. त्यांच्या जीवनातील सुरुवातीचा काळ संघर्षाचा होता. मनोहर जोशींचे वडिल भिक्षुकी करायचे. त्यामुळे जोशींनीही पुढे ते काम स्वीकारलं. पण नंतर ते बाळासाहेबांच्या संपर्कात आले आणि त्यांचं आयुष्यच बदललं.

कट्टर शिवसैनिक आणि बाळासाहेबांचे निष्ठावंत अशीच त्यांची ओळख होती. जी शेवटपर्यंत कायम राहिली. मनोहर जोशींचा जन्म 2 डिसेंबर 1937 रोजी रायगड जिल्ह्यातील नांदवी गावात झाला. त्यांनी मुंबईत सिव्हील इंजिनिअरींगची पदवी मिळवली. मनोहर जोशींची राजकीय कारकिर्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेपासून झाली असे म्हणण्यास हरकत नाही. त्यानंतर ते शिवसेनेचे सदस्य झाले. 1980 च्या दशकात ते शिवसेनेचे प्रमुख नेते म्हणून उदयास आले. मनोहर जोशी यांचे संघटन कौशल्य वाखाणण्याजोगे होते. तळागाळातील लोकांशीही त्यांचा दांडगा संपर्क होती. त्यांची हीच खासियत बाळासाहेबांच्या नजरेत भरली होती.

Manohar Joshi : बाळासाहेबांचा एक आदेश अन् मनोहर जोशींनी क्षणात मुख्यमंत्रिपद सोडलं

1970 च्या दशकात जोशी विधान परिषदेवर निवडून आले. यानंतर 1976 ते 1977 या दोन वर्षांच्या काळात मुंबईचे महापौर म्हणून त्यांनी काम केले. 1995 ते 1999 या चार वर्षांत युती सरकारचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. यानंतर केंद्रातील अटलहबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात 2002-2204 या काळात जोशी लोकसभा अध्यक्ष होते. मुंबई सेंट्रल मतदारसंघातून मनोहर जोशी खासदार झाले. तसेच सहा वर्षे राज्यसभेचे खासदारही राहिले.

मनोहर जोशी मे 2023 पासून सारखे आजारी असायचे. आरोग्याच्या अनेक समस्यांनी त्रस्त होते. त्यांना ब्रेन हॅमरेजचाही त्रास होता. त्यांना हिंदूजा रुग्णालयातील आयसीयूत दाखल करण्यात आले होते. यानंतर ते कोमात गेले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली होती. अखेर आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. बाळासाहेब ठाकरेंचा एक कट्टर शिवसैनिक काळाच्या पडद्याआड गेला. बाळासाहेब नेहमी म्हणायचे माझी शिवसेना ही तमाम शिवसैनिकांच्या बळावर उभी आहे. त्यातीलच एक शिवसैनिक आज काळाच्या पडद्याआड गेला.

गुरुजी गेले! माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन; अवघा महाराष्ट्र शोकाकुल

follow us