कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील (Kolhapur) शिरगाव येथील माजी सरपंच सुरेखा शिवाजी न्यारे (वय ४०) यांच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अनैतिक संबंध आणि लग्नाच्या वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक तपासात संशय असून, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो कारच्या डिक्कीत ठेवून भिवंडीकडे नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी प्रकाश ऊर्फ बाबू आनंदा पाटील याला नारपोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेखा न्यारे या विधवा होत्या. त्यांचे आणि संशयित प्रकाश पाटील यांच्यात काही काळापासून अनैतिक संबंध असल्याचे समोर आले आहे. सुरेखा न्यारे या प्रकाश पाटील याच्याकडे लग्नासाठी आग्रह धरत होत्या. या कारणावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता.
कौटुंबिक वाद विकोपाला; पोटच्या मुलाकडून 70 वर्षीय वडिलांची विटेने ठेचून हत्या
प्राथमिक तपासानुसार, २६ जुलै रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास शिरगाव येथील शेतात प्रकाश पाटील याने सुरेखा न्यारे यांचा गळा दाबून खून केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह इको कारच्या डिक्कीत ठेवून तो भिवंडी तालुक्यातील कशेळी येथे राहणाऱ्या नातेवाईकाकडे घेऊन गेला.
दरम्यान, संशयिताने केलेल्या हत्येची माहिती नातेवाईकाला समजल्यानंतर त्याने तत्काळ नारपोली पोलिसांना याबाबत माहिती दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कदबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि संशयित प्रकाश पाटील याला अटक केली.
मृतदेहाचे शवविच्छेदन भिवंडी येथे करण्यात आले असून त्यानंतर तो पुढील कार्यवाहीसाठी कोल्हापूरला रवाना करण्यात आला. नारपोली पोलिसांनी शून्य क्रमांकाने खुनाचा गुन्हा नोंदवून प्रकरण पुढील तपासासाठी कोल्हापूर पोलिसांकडे वर्ग केले आहे. या घटनेमुळे शाहूवाडी तालुक्यात खळबळ उडाली असून, नेमके कारण आणि इतर बाबींचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे.
