कौटुंबिक वाद विकोपाला; पोटच्या मुलाकडून 70 वर्षीय वडिलांची विटेने ठेचून हत्या
आरोपी फुलचंद श्रीकिसन कोठुळे याने दुचाकी परवानगीशिवाय का दिली, यावरून संताप व्यक्त करत घरातील सदस्यांशी वाद घातला.
बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील चिंचवण येथे कौटुंबिक वादातून अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. दुचाकीच्या कारणावरून झालेल्या वादात स्वतःच्या ७० वर्षीय वडिलांची विटेने ठेचून हत्या केल्याचा आरोप मुलावर आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून वडवणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
मृताचे नाव श्रीकिसन भागोजी कोठुळे (वय ७०, रा. चिंचवण, ता. वडवणी) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार शुभम कोठुळे याने उसने घेतलेले पैसे फेडण्यासाठी घरातील दुचाकी दिली होती. याच कारणावरून घरात वाद निर्माण झाला. आरोपी फुलचंद श्रीकिसन कोठुळे याने दुचाकी परवानगीशिवाय का दिली, यावरून संताप व्यक्त करत घरातील सदस्यांशी वाद घातला. त्यानंतर पत्नी आणि मुलाला मारहाण करण्यासाठी तो धावून गेला.
त्याचं मुंडक छाटून माझ्याकडं आणा; नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग, बीडच्या परळीत जीवघेणा हल्ला
घरातील वाद मिटवण्यासाठी आणि मुलाला शांत करण्यासाठी श्रीकिसन कोठुळे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, “तुम्ही आमच्या भांडणात का पडता?” असा संताप व्यक्त करत आरोपीने आपल्या वृद्ध वडिलांना घराबाहेर अंगणात ओढून नेले. त्यानंतर त्यांना खाली पाडून अंगणात पडलेल्या विटेने त्यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले.
जखमी अवस्थेत नातेवाईकांनी श्रीकिसन कोठुळे यांना प्रथम चिंचवण येथील ग्रामीण रुग्णालयात, त्यानंतर पुढील उपचारासाठी बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी मृताचे नातू शुभम फुलचंद कोठुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी फुलचंद श्रीकिसन कोठुळे याच्याविरुद्ध वडवणी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून आरोपीविरुद्ध आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यात अलिकडच्या काही दिवसांत घडलेल्या गंभीर गुन्ह्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.