Anil Parab : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. काल शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी उलटतापसणीत अनेक धक्कादायक खुलासे केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंबाबतही वक्तव्य केले. त्यामुळे ठाकरे गटाचे नेते चांगलेच भडकले आहेत. माजी मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी केसरकरांना कठोर शब्दांत फटकारले आहे. बाळासाहेबांबद्दल या लोकांच्या मनात प्रेम नाही. बाळासाहेबांनाच आता खोटं ठरवण्याचं काम केसरकरांनी उलट तपासणीत केलं, असा घणाघात परब यांनी केला.
ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केसरकर यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, आमदार अपात्रतेची सुनावणी सुरू आहे. या सुनावणीत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची उलट तपासणी सुरू आहे. ज्या शिवसेनेत स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मानले जात नाहीत म्हणत शिवसेनेतून बाहेर पडलेल्या गटाचे ते नेते आहेत. केसरकर 2014 साली शिवसेनेत आले. ज्यावेळी केसरकर राष्ट्रवादी काँग्रेसमधून आमदार झाले त्यावेळी ते बाळासाहेबांच्या विचाराविरोधात लढत होते. अशी माणसं बाळासाहेबांचा विचार घेऊन आम्हाला शिवसेना शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, आज तर हद्दच झाली. केसरकरांनी त्यांच्या उलट तपासणीत केसरकरांनी बाळासाहेबांनी कधीही निवडणूक प्रक्रिया राबवली नाही. एका पद्धतीने त्यांनी मनमानी केली. लोकशाहीचा आदर केला नाही अशा प्रकारचे संकेत त्यांनी उलट तपासणीत दिले.
Deepak Kesarkar : मंत्री झाल्यानंतर 25 कोटींची ऑफर.. केसरकरांच्या वक्तव्याने खळबळ !
बाळासाहेबांचे विचार आणि शिकवण मानणारे लोक आज अशी भाषा करत आहेत की 1999 पासून आजपर्यंत कोणतीही निवडणूक प्रक्रिया राबवली गेली नाही. केसरकरांनी थोडा अभ्यास करायला पाहिजे होता, माहिती घ्यायला पाहिजे होती येथे येताना साक्ष देताना बाळासाहेब कसे होते, त्यांनी कशा पद्धतीनं काम केलं. निवडणूक प्रक्रिया शिवसेनेत आधीपासूनच होत राहिली त्यामुळे बाळासाहेबांनाच खोटं ठरवण्याचं काम, त्यांना वाईट ठरवण्याचं, मनमानी ठरवण्याचं काम केसरकरांनी आज केलं. मी फक्त तुम्हाला सांगण्यासाठी आलोय की बाहेर एक बोलायचं आणि उलट तपासणीत दुसरंच बोलायचं अशी दुटप्पी भूमिका घ्यायची. यांना बाळासाहेबांबद्दल काहीच प्रेम नाही. यांच्या मनातला आकस आता आम्हाला दिसू लागला आहे.