अडीच-तीन वर्षांपूर्वी झालेले एकनाथ शिंदे यांचे बंड पुन्हा आठवा. पक्षाच्या आमदारांनी बंडाचा झेंडा हाती घेण्यास सुरुवात केली. आणि बघता-बघता तब्बल 39 आमदारांनी पक्षनेतृत्वाला आव्हान दिले. एकनाथ शिंदेंसोबत (Eknath Shinde) बंडखोर गटात सामील होणे पसंत केले. पण ठाकरेंसोबत राहिले केवळ 16 आमदार. यात कोकणातून सोबत होते, वैभव नाईक, भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) आणि ठाकरेंचे कडवट शिवसैनिक अशी ओळख असलेले राजन साळवी (Rajan Salavi). साळवी यांनी बंडाच्या वादळात भक्कमपणे शिवसेनेचा भगवा हातात ठेवला. कोकणातील ठाकरेंचे हे तीन चेहरे म्हणून राज्यभर गाजले. पण विधानसभेला नाईक आणि साळवी यांचा पराभव झाला. तर भास्कर जाधव अवघ्या 2900 मतांनी विजयी झाले. आता यातीलच साळवी यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. तर भास्कर जाधवही शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्यावर असल्याचे बोलले जाते. त्यामुळे कोकणात उद्धव ठाकरेंकडे कोणी माणूसच राहिलेला नाही का? असा सवाल विचारला जात आहे…
शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. पायाला भिंगरी बांधून कोकणात रुजविली. त्यामुळे कोकण म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला होता. शिवसेना तळागाळात पहायला मिळत होती. अगदी 2022 पर्यंत हीच स्थिती होती. सावंतवाडी, कुडाळ, रत्नागिरी, राजापूर, दापोली, गुहागर, कर्जत, अलिबाग, महाड असे तब्बल नऊ आमदार निवडून आले होते. विनायक राऊत खासदार होते. अनंत गिते यांचा थोडक्यात पराभव झाला होता. पण एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सगळी परिस्थितीच बदलली. वैभव नाईक, राजन साळवी आणि भास्कर जाधव हे तिघे आमदार वगळता कोकणातील दीपक केसरकर, उदय सामंत, योगेश कदम, भरत गोगावले, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी असे सगळे आमदार महायुतीच्या बाजूने गेले. 2024 च्या निवडणुकीत तर ठाकरेंचे अक्षरश: पानीपत झाले.
आधी लोकसभेला तळ कोकणात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून विनायक राऊत यांचा भाजप उमेदवार विद्यमान खासदार नारायण राणे यांनी पराभव केला. तर रायगडमधून सुनील तटकरे यांनी अनंत गिते यांचा पराभव केला. मग विधानसभेला सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या तिन्ही जिल्ह्यांमधून भास्कर जाधवच आमदार झाले. राजन तेली, वैभव नाईक, राजन साळवी या दिग्गजांसह संदेश पारकर, बाळ माने, मनोहर भोईर, स्नेहल जगताप यांचा पराभव झाला. कार्यकर्ते आणि पदाधिकारी विभागले गेल्याने फुटीनंतर ठाकरेंची ताकद कमी झाल्याचे स्पष्ट झाले. तर भाजपच्या मदतीमुळे महायुती भक्कम झाली होती. पण सिंधुदुर्गमध्ये वैभव नाईक आणि रत्नागिरीतून राजन साळवी यांनी भक्कमपणे पक्षबांधणीला सुरुवात केली होती.
मात्र मागच्या काही दिवसांपासून राजन साळवी यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला होता. मागच्या एक वर्षापासून साळवी यांच्यामागे लाचलुचपत प्रतिबंध विभागाचा ससेमिरा लागला आहे. राजन साळवी, त्यांची पत्नी अनुजा साळवी आणि मुलगा शुभम साळवी यांच्याविरुद्ध अपसंपदेचा गुन्हा दाखल आहे. यासंदर्भात त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची अनेकदा चौकशीही झाली. नुकतीची त्यांच्या व्यावसायिक भागीदार दिनकर सावंत यांचीही चौकशी झाली होती. सावंत यांना साळवी कुटुंबासोबत भागीदार म्हणून असताना टेंडर फाइल आणि इतर कागदपत्रे एसीबीने मागवली होती. याच पार्श्वभूमीवर आता साळवी यांचा भाजपप्रवेश होत असल्याची चर्चा आहे.
त्याचवेळी भास्कर जाधव यांनीही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जवळजवळ काँग्रेस झालीय, अशी टीका करत नुकताच घरचा आहेर दिला आहे. जे पदाधिकारी काम करीत नाहीत, ते नाराज होऊ नयेत म्हणून त्यांना दुसरे पद दिले जाते. त्यांना पदावरून हटविण्याची हिंमत आमच्यामध्ये नाही. शाखाप्रमुख वगैरे पदांचा कालावधी निश्चित केला पाहिजे. तरच त्यांच्यामध्ये काम करण्याची स्पर्धा लागेल. काही पदाधिकारी दहा-दहा पंधरा-पंधरा वर्षांपासून एका जागेवर बसलेले आहेत. माझ्या पदाला कुणी हात लावू शकत नाही, असता त्यांचा समज झालेला आहे. मी कुठल्यातरी नेत्याची मर्जी सांभाळली की, माझे पद शाबूत. पूर्वी पक्षाचा कार्यक्रम असला की शाखाप्रमुखाच्या अंगात अंगार संचारायचा, आज शाखाप्रमुख कोण आहेत, किती आहेत, कुठे आहेत, याचा आढावा घ्यायला लागेल, असे भास्कर जाधव म्हणाले होते. तेव्हापासून जाधव हेही ठाकरेंना जय महाराष्ट्र करू शकतात, अशी चर्चा सुरू आहे.
तळकोकणातील राजन तेली यांनीही काही दिवसांपूर्वीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. उबाठाचे तालुकाप्रमुख व माजी नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी, माजी खासदार विनायक राऊत यांचे विश्वासू आणि कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेले उबाठाचे कार्यालयीन प्रमुख संदीप सुर्वे असे पदाधिकारी पक्ष सोडून जात आहेत. एका बाजूला या सगळ्या घडामोडी सुरू असताना, पक्ष बांधणीचे मोठे आव्हान असतानाच कोकणात ठाकरेंना रवींद्र चव्हाण यांचाही धसका घ्यावा लागणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आणि माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर भाजपाने महाराष्ट्र राज्याची धुरा सोपविली आहे. एक कुशल संघटक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी कोकणसह मुंबई भागातून भाजपसह मित्रपक्षांना यश मिळण्यासाठी विशेष परिश्रम घेतले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्यासाठी रवींद्र चव्हाण आणि कार्यकर्त्यांनी फिल्डिंग लावली आहे.
त्यामुळेच ठाकरे यांच्याकडे आता कोकणात माणूस कोण राहतो? तुमच्या डोक्यात कोणते नाव येते, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.