Download App

Aditya Thackeray यांना महाजनांनी खिजवलं… हा तर बालिशपणा

पुणे : आदित्य ठाकरेंचं आव्हान देण्याचं वक्तव्य म्हणजे बालिशपणा असल्याचे टीकास्त्र भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केलं आहे. महाजन आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील विविध घडामोडींवर भाष्य केलं आहे.

ते म्हणाले, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य म्हणजे शाळेत आणि नळावरचं भाडणं असल्यासारखं वक्तव्य आहे. त्यांचं वक्तव्य ऐकल्यानंतर मला माझे शाळेतले दिवस आठवल्याचं त्यांनी सांगितलं आहे. “शाळेत असताना आपले भांडणं झाल्यानंतर आपण म्हणतो की तु माझ्या घराजवळ ये मग मी तुला सांगतो” अगदी तसंच मी राजीनामा देतो माझ्या मतदारसंघात येऊन निवडणूक लढवा, असं विधान आदित्य ठाकरेंनी केलंय.

तसेच आदित्य ठाकरे यांच्याकडे दुसरे काही काम उरले नसल्याने ते सध्या सर्वांचंच प्रसारमाध्यांद्वारे आपलं मनोरंजन करण्याच काम करत असल्याचंही खोचक विधान त्यांनी यावेळी केलंय. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आव्हान दिलं होतं.

ठाकरे म्हणाले होते, मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो, तुम्ही वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवा, तुम्ही एकही मत फोडू शकणार नाहीत, काय खोके वाटायचे आहेत ते वाटा, असं आव्हानच त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं होतं.

त्यानंतर शिंदे गटासह भाजपच्या अनेक नेत्यांकडून त्यांच्यावर टीक-टीपण्या करण्यात आल्या आहेत. आदित्य ठाकरे यांच्या आव्हानावरुन त्यांच्यावर शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनीदेखील टीकास्त्र सोडले आहे. तुम्ही राजीनामा द्याच मी तुमचं स्वागत करणार असल्याचा इशाराच त्यांनी यावेळी दिला आहे.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी आव्हान दिल्यानंतर आता आदित्य ठाकरे यांना अनेक नेत्यांकडून ट्रोल करण्यात येत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आता आदित्य ठाकरे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us