Glorification of Maoists at Jayanti event : पुण्यातील शासकीय वसतिगृहात आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमादरम्यान माओवादी कमांडर हिडमा मडावीच्या कथित उदात्तीकरणाचा आरोप झाल्यानंतर आता या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. यासंदर्भात अखेर दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संपूर्ण घटनेची विविध यंत्रणांकडून सखोल चौकशी सुरू आहे. शब्बीर बाबा शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किरण नारायण गोमासे आणि श्रीनिवास हनुमंत कुमरी यांच्या विरोधात विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे शैक्षणिक आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
विश्रांतवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी ओ रे बंदूकवाले या गाण्यावर नृत्य सादर केले. मात्र, या गाण्यात माओवादी कमांडर हिडमा मडावीचे गौरवगण असल्याचा आरोप समोर आला. या सादरीकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा वाद चिघळला.
याच कार्यक्रमात जंगल का राजा हिडमा या नावाचे नाट्यसादरीकरण देखील करण्यात आल्याचे समोर आले आहे. गाण्यातील आणि नाट्यप्रयोगातील काही आशयामुळे कुख्यात नक्षलवादी नेत्याचे उदात्तीकरण होत असल्याची चर्चा रंगली असून यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. घटनेची गांभीर्याने दखल घेत पुणे पोलीस, दहशतवाद विरोधी पथक आणि समाजकल्याण विभागाने तपास सुरू केला आहे. या प्रकरणामागे कोणतीही नक्षलवादी विचारसरणीचा प्रभाव आहे का, तसेच विद्यार्थ्यांना चुकीच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न झाला आहे का, याचा सर्व बाजूंनी तपास केला जात आहे.
आनंदाची बातमी; वारंवार रेशन दुकानांच्या फेऱ्या टळणार, एप्रिल महिन्यातच तीन महिन्यांचं धान्य मिळणार
समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, प्राथमिक चौकशीत विद्यार्थ्यांकडून ही गाण्याची निवड अनवधानाने झाल्याचे दिसून आले आहे. युट्युबवर उपलब्ध असलेल्या गाण्यांमधून केवळ धून आवडल्यामुळे विद्यार्थ्यांनी ते निवडले होते. कार्यक्रम पूर्णतः सांस्कृतिक स्वरूपाचा होता आणि कोणताही वाद निर्माण करण्याचा उद्देश नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले.
वसतिगृह परिसरात एकूण सात वसतिगृहे असून सुमारे एक हजार विद्यार्थ्यांची क्षमता आहे. परीक्षेनंतर आयोजित या कार्यक्रमाला सुमारे 600 ते 700 विद्यार्थी उपस्थित होते. त्यापैकी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्याची माहिती देखील समोर आली आहे. दरम्यान, या घटनेनंतर प्रशासनाने विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले असून अशा प्रकारांची गंभीरता समजावून सांगितली आहे. तसेच, कार्यक्रमासाठी आवश्यक अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नव्हती, ही बाब देखील तपासात उघड झाली आहे. पोलिसांवर हल्ल्यांशी संबंधित असलेल्या व्यक्तीचे गीतच निवडले कसे गेले? या प्रश्नामुळे या वादाला आणखी धार मिळाली आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
