पुणे : देशाचे घटनाकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कारासाठी १९९० पर्यंत वाट बघावी लागली. तोही त्यांना मरणेत्तर पुरस्कार मिळाला. तर दुसरीकडे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूं यांच्या काळामध्ये तुम्ही सामाजिक न्यायाची बाजू जरा तपासून बघा. स्वतः पंतप्रधान असताना सामाजिक न्यायाची भूमिकेतून त्यांनी स्वत :ला भारतरत्न हा सर्वोच्च किताब घेतला, अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटच्या वतीने आयोजित ६ व्या युवा संसद सभेमध्ये ‘आयडिया ऑफ इंडिया’ या सत्रामध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर बोलत होते.
गोपीचंद पडळकर म्हणाले की, संस्कृती असेल, आपल्या परंपरा असेल या जपण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये काशी विश्वेश्वराच्या माध्यमातून केला. अखंड देशभरात या कॉरिडॉरचं स्वागत केले गेले. पंतप्रधान मोदी यांनी कार्तिक विश्वेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी, शंकराचार्य आणि स्वामींचा पुतळा उभा केला. त्यांच्यामुळे देशामध्ये पायाभूत सुविधांचे मोठं जाळे तयार होत आहे. समृद्धी महामार्ग तयार केला. पायाभूत सुविधा तयार केल्या पाहिजेत म्हणून आता त्यांनी पुणे ते बंगळुरु महामार्गाची घोषणा केली. त्यासाठी १४ हजार कोटी रुपये जाहीर केले आहेत. त्यामुळे तुम्हाला आता जेवढा वेळ लागतोय त्याच्या निम्या वेळामध्ये तुम्ही बंगळुरुला पोहोचू शकता.