Gopichand Padalkar used objectionable language regarding Jayant Patil : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. जयंत पाटील यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्या कुटुंबाबद्दलही अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोप होत आहे. पडळकर यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस नेते सतेज पाटील आणि आमदार रोहित पाटील यांनी संताप व्यक्त करत या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यातील राजकीय वाद आता नव्या वळणावर पोहोचला आहे. पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका केली. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
काँग्रेस नेते आणि आमदार सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला. अशा प्रकारची भाषा महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला शोभणारी नसल्याचं त्यांनी म्हटलं. भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाच्या आमदाराने सार्वजनिक मंचावर अशा शब्दांचा वापर करणं हा महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा अपमान असल्याची टीकाही सतेज पाटील यांनी केली.
गोकुळचा गड महायुती राखणार की सतेज पाटील सत्तांतर घडवणार? संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष कोल्हापूरच्या निकालाकडे!
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील यांनीही पडळकर यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जयंत पाटील यांच्यावरील टीका अश्लाघ्य आणि संतापजनक असल्याचं सांगत त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वालाही लक्ष्य केलं. भाजपने या वक्तव्याचा निषेध केला नाही, तर पडळकर यांना पक्षातील वरिष्ठांचं पाठबळ असल्याच्या आरोपांना बळ मिळेल, असा इशाराही रोहित पाटील यांनी दिला.
जयंत पाटील यांच्यावर टीका करताना गोपीचंद पडळकर यांनी एकेरी भाषेचा वापर केला. तसेच, आपल्यामध्ये कार्यक्रम करण्याची धमक असल्याचं सांगत त्यांनी जयंत पाटील यांना आव्हान दिलं. व्यापाऱ्यांकडून पैसे घेतल्याच्या आरोपांचाही त्यांनी उल्लेख केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वाद अधिकच चिघळला आहे.
एकीकडे पडळकर यांच्या वक्तव्यावरून सतेज पाटील आणि रोहित पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे, तर दुसरीकडे भाजपकडून या प्रकरणावर काय भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना, या वादावर भाजपचं वरिष्ठ नेतृत्व काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
