सोमेश्वरच्या सत्तेचा फैसला आज! सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी?
कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी नऊ वाजता माळेगाव येथील अजिंठा मॅजेस्टिक हॉलमध्ये सुरू झाली आहे.
Someshwar Sugar Factory results today : बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी नऊ वाजता माळेगाव येथील अजिंठा मॅजेस्टिक हॉलमध्ये सुरू झाली आहे. कारखान्याच्या 21 संचालक पदांसाठी रविवारी मतदान पार पडले. या निवडणुकीत एकूण 27 हजार 625 मतदारांपैकी 23 हजार 393 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे मतदानाची टक्केवारी 84.25 टक्के इतकी राहिली. आता सभासदांनी कोणाच्या बाजूने कौल दिला, याकडे संपूर्ण बारामतीसह राज्याचे लक्ष लागले आहे.
सोमेश्वर कारखान्याची निवडणूक यंदा तिरंगी झाल्याने राजकीय चुरस अधिक वाढली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलने निवडणूक लढवली. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पॅनेल मैदानात उतरले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करत विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी भाजपच्या मदतीने स्वतंत्र पॅनेल उभे केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष, पवार कुटुंबातील राजकीय समीकरणे आणि जगताप यांचे स्वतंत्र आव्हान यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे.
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश, सरकारने कोणत्या मागण्या मान्य केल्या, कोणत्या अद्याप प्रलंबित?
या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांनी सलग आठ दिवस सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात मुक्काम करत प्रचाराची धुरा सांभाळली आणि परिसरातील मतदारांशी थेट संपर्क साधला. युवा नेते जय पवार यांनीही विविध ठिकाणी दौरे करत तरुणांमध्ये उत्साह निर्माण केला. खासदार पार्थ पवार यांनी पडद्यामागून निवडणुकीचे नियोजन आणि रणनीती आखल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे, ‘लोकनेते अजितदादा पवार पॅनेल’चे प्रमुख पुरुषोत्तम जगताप यांनी स्वतंत्र पॅनेलच्या माध्यमातून जोरदार आव्हान उभे केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सहकार क्षेत्रातील ही पहिलीच निवडणूक असल्याने या निकालाला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने पुरुषोत्तम जगताप यांच्यावर केलेल्या कारवाईचा परिणाम मतदारांच्या कौलावर कितपत होतो, तसेच पवार कुटुंबातील दोन्ही गटांना आणि जगताप यांच्या पॅनेलला किती प्रतिसाद मिळतो, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचं पुण्यात निधन, लावणी आणि अभिनयातून उमटवला अमीट ठसा
मतमोजणीसाठी 93 टेबलांची व्यवस्था करण्यात आली असून एकाच फेरीत मतमोजणी पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या प्रक्रियेसाठी सुमारे साडेचारशे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सर्व निकाल रात्री उशिरापर्यंत हाती येण्याची शक्यता आहे.
एकूणच, सोमेश्वर साखर कारखान्याचे नवे कारभारी कोण ठरणार, सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखालील पॅनेल बाजी मारणार, शरद पवार गट आपली ताकद दाखवणार की पुरुषोत्तम जगताप यांच्या स्वतंत्र पॅनेलला सभासदांचा कौल मिळणार, याचे उत्तर आजच्या मतमोजणीतून मिळणार आहे. त्यामुळे सोमेश्वर कारखान्याच्या निकालाकडे बारामतीसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.