Graduates and Teachers Constituancy election CM Fadnaviss witty remark on votes : महाराष्ट्रातील शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी महायुती सरकारने सर्वाधिक काम केल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्यात उद्योग क्षेत्राचा विस्तार होत असून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करण्यात सरकारला यश मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर, दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते.
‘बाद मतांची संख्या पाहता शैक्षणिक पात्रतेची तपासणी करावी लागेल’
राज्यातील पाच विधानपरिषद मतदारसंघांच्या निवडणुकांसाठी सध्या प्रचार सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर सांगली येथे आयोजित शिक्षक आणि पदवीधर मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी मतदान प्रक्रियेतील बाद मतांच्या मुद्द्यावरून मिश्किल टिप्पणी केली. मतदान करताना मोठ्या प्रमाणावर मते बाद होत असतील, तर संबंधित मतदारांच्या शैक्षणिक पात्रतेबाबतही विचार करावा लागेल, असे ते म्हणाले. “दहा हजार मते बाद होत असतील, तर अशा पदवीधर आणि शिक्षकांना पदवी कोणी दिली, हे तपासावे लागेल,” अशा शब्दांत त्यांनी उपस्थितांना टोला लगावला.
महाराष्ट्र गुंतवणुकीत आघाडीवर असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा
राज्यातील औद्योगिक विकास आणि गुंतवणुकीच्या मुद्द्यावर बोलताना फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या कामगिरीचा उल्लेख केला. मागील वर्षी राज्यात सुमारे ३० लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, परकीय गुंतवणूक आकर्षित करण्याच्या बाबतीतही महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा त्यांनी केला.
Gen-Alpha मुळे जॉर्जिया मेलोनींसमोर आव्हान; इटलीत 4 हजार 400 कोटींच्या मालमत्तेची जाळपोळ?
राज्यात अधिकाधिक उद्योग उभारून तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे, हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. औद्योगिक क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासोबतच रोजगारनिर्मितीलाही मदत होईल, अशी भूमिका त्यांनी मांडली.
दुष्काळी भागांना पाणी, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार कटिबद्ध
पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागांमध्ये पाणी पोहोचवण्यासाठी महायुती सरकारने प्रयत्न केल्याचे फडणवीस यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करण्याचा निर्णयही सरकारने घेतल्याचा त्यांनी उल्लेख केला.
राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असली, तरी शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. शिक्षकांचे प्रश्न, राज्यातील औद्योगिक गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि शेतकऱ्यांना मदत या मुद्द्यांवर भर देत फडणवीस यांनी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांसाठी मतदारांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
