नवापूर नगरपालिकेतच्या निवडणुकीसाठी (BJP) भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने नगराध्यक्षांसह पूर्ण पॅनल उभे केले आहे. यात अचानकपणे जिल्हा विकास आघाडीने नगराध्यक्षसह पूर्ण पॅनल उभे केले. मात्र, नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणारे विश्वास बडोगे या अपक्ष उमेदवाराला गुजरात पोलिसांच्या विशेष पथकाने 20 नोव्हेंबरला सायंकाळी अटक केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
नवापूर पालिकेसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतर्फे जयंत जाधव, भाजपातर्फे अभिलाषा वसावे पाटील तर काँग्रेसतर्फे दिपचंद जयस्वाल यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाली आहे. त्यानंतर पालिकेसाठी जिल्हा विकास आघाडीतर्फे विश्वास बडोगे यांनी नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवारी दाखल करत पूर्ण पॅनल निवडणूक रिंगणात उतरवले. त्यांना माजी आमदार शरद गावित यांनी त्यांच्या पॅनलला पाठिंबा देत शक्तिप्रदर्शन करीत प्रचार फेरीही काढली होती.
आपल्याला ड्रग्ज-दहशतवादाशी लढावं लागेल, G20 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींनी ठेवले 3 प्रस्ताव
उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा विकास आघाडीतर्फे अपक्ष लढणाऱ्या विश्वास बडोगे यांना गुजरात पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर गुजसी टॉक अर्थात गुजरात दहशतवाद आणि संघटीत गुन्हे नियंत्रण कायदा (G.C.T.O.C.) कायदा २०१५ च्या कलम ३(१)(२) आणि कलम ३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळेच त्यांना गुजरात पोलिसांच्या गांधीनगर येथील पथकाने अटक केली आहे. मात्र, गुजरात पोलिसांच्या अटकेच्या टायमिंगबद्दल सर्वत्र चर्चा होत आहे.
विश्वास बडोगे यांच्यावर माघारीसाठी प्रचंड दबाव होता. मात्र त्यांनी नकार दिल्यानेच त्यातूनच त्यांना अटक झाल्याचा चर्चा सध्या नवापुरमध्ये रंगत आहे. विशेष म्हणजे गुजरात पोलिसांना त्यांना नवापूर शहरातून त्यांच्या निवासस्थानी असताना ताब्यात घेतले. मात्र दुसऱ्या दिवशी अटक गुजरात राज्यातील भडभुंजा येथून दाखवली.
त्यामुळे बडोगे यांच्यावर केलेली कारवाई संशयास्पद वाटत आहे, अशी सध्या परिसरात चर्चा आहे. दरम्यान, “विश्वास बडोगे यांच्यावरील कारवाई सुडबुध्दीने केली असून निवडणुकीत इतर पक्षांच्या पायाखालची वाळू सरकल्यानी ही कारवाई करण्यात आली”, असा आरोप माजी आमदार शरद गावित यांनी केला आहे. तसेच “कॅप्टन आऊट झाला तरी कोच अजून रिंगणात आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
