राज्यसभा ते विधान परिषद; दोन्ही निवडणुकांत सत्तासमीकरणांची कसोटी
राज्यसभा निवडणुकीनंतर लगेचच मे महिन्यात विधान परिषदेच्या नऊ जागा रिक्त होणार आहेत. 13 मे 2026 रोजी नऊ सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे.
Nine seats in the Legislative Council will fall vacant in May : राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून 16 मार्च रोजी राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीचं पारडं जड असल्याचं चित्र आहे. उपलब्ध संख्याबळानुसार सातपैकी सहा जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, तर उर्वरित एक जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला जाऊ शकते.
महायुतीत सर्वाधिक फायदा भाजपाला होणार असल्याचं दिसतं. चार जागा भाजपाच्या वाट्याला जाण्याची शक्यता असून शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना प्रत्येकी एक जागा मिळू शकते. दुसरीकडे महाविकास आघाडीत मात्र एका जागेसाठी चुरस वाढली आहे. शिवसेना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यात त्या एका जागेसाठी अंतर्गत चर्चा आणि रणनीती आखली जात आहे.
दरम्यान, राज्यसभा निवडणुकीनंतर लगेचच मे महिन्यात विधान परिषदेच्या नऊ जागा रिक्त होणार आहेत. 13 मे 2026 रोजी नऊ सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. यामध्ये उद्धव ठाकरे (शिवसेना उबाठा), नीलम गोऱ्हे (शिवसेना), अमोल मिटकरी (राष्ट्रवादी), शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी श.प.), राजेश राठोड (काँग्रेस), तसेच भाजपाचे प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते पाटील आणि रमेश कराड यांचा समावेश आहे.
सुपर-8ची समीकरणे गुंतागुंतीची; नेट रन रेट प्लसमध्ये नेण्यासाठी भारताला काय करावे लागेल?
विशेष म्हणजे गोपीचंद पडळकर आणि प्रवीण दटके हे 2024 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांच्या विधानपरिषद जागांवर भाजपाकडून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. रणजितसिंह मोहिते पाटील यांचे पक्षांतर्गत संबंध तितकेसे सुसंवादी नसल्याची चर्चा असल्याने त्यांनाही पुन्हा संधी मिळेल का, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.
उद्धव ठाकरे यांचीही विधान परिषदेची जागा रिक्त होत असल्याने ते पुन्हा सभागृहात दिसणार का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र आदित्य ठाकरे यांच्याकडून पक्षासाठी किमान एका जागेचा आग्रह धरण्यात येत असल्याची माहिती आहे. विधानसभेतील विद्यमान संख्याबळ लक्षात घेतल्यास विधान परिषदेच्या नऊ जागांपैकी बहुसंख्य जागा सत्ताधारी महायुतीकडे जाण्याची शक्यता आहे.
सध्या विधानसभेत भाजपाचे 132, शिंदे गटाच्या शिवसेनेचे 57, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे 40, उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे 20, काँग्रेसचे 16, शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे 10 आमदार आहेत. याशिवाय समाजवादी पक्षाचे 2, जनसुराज्य पक्षाचे 2, युवा स्वाभिमान पक्षाचा 1, राष्ट्रीय समाज पक्षाचा 1, एमआयएमचा 1 आणि सीपीआयचा 1 आमदार आहे. या संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुका या दोन्हींसाठी सत्ताधारी आणि विरोधकांकडून काटेकोर राजकीय गणिते मांडली जात आहेत. राज्यसभा निवडणुकीतील निकाल आणि त्यानंतरची विधान परिषद निवडणूक राज्यातील सत्तासमीकरणांवर महत्त्वपूर्ण परिणाम घडवू शकते.
