एसटी महामंडळाची 13.50 टक्के भाडेवाढीची तयारी, डिझेल, टायर आणि कर्मचाऱ्यांच्या वाढीव खर्चाचा परिणाम
राज्य परिवहन महामंडळाने 13.50 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केल्याने प्रवाशांच्या पदरी निराशा पडण्याची शक्यता आहे.
ST Corporation’s decision to hike fares : राज्यातील लाखो एसटी प्रवाशांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. उन्हाळी हंगामासाठी लागू करण्यात आलेली 10 टक्के तात्पुरती भाडेवाढ आज, 15 जुलै रोजी संपुष्टात येत असताना ती रद्द होईल, अशी प्रवाशांना होती. मात्र, त्याऐवजी राज्य परिवहन महामंडळाने 13.50 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केल्याने प्रवाशांच्या पदरी निराशा पडण्याची शक्यता आहे. आज होणाऱ्या राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत या प्रस्तावावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता असून मंजुरी मिळाल्यास नव्या भाडेवाढीची अंमलबजावणी तातडीने करता येणार आहे.
राज्यात 15 एप्रिल ते 15 जून या कालावधीत 10 टक्के हंगामी भाडेवाढ लागू करण्यात आली होती. त्यानंतर या वाढीला 15जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत आह संपत असताना एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने 13.50 टक्के कायमस्वरूपी भाडेवाढीची शिफारस केली आहे. त्यामुळे सध्या लागू असलेल्या 10 टक्के वाढीच्या तुलनेत आणखी 3.50 टक्क्यांची भर पडणार आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाने गर्दीच्या हंगामात एसटी महामंडळाला 30 टक्क्यांपर्यंत भाडेवाढ करण्याची मुभा दिली असून राज्य सरकारने देखील कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर वाढते खर्च स्वतःच्या उत्पन्नातून भागवण्यासाठी महसूल वाढवण्याचे मार्ग शोधण्याच्या सूचना महामंडळाला दिल्या आहेत.
यावेळी भाडेवाढीसोबतच तिकीट दर पाच रुपयांच्या पटीत ठेवणायचा देखील प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यापूर्वी जानेवारी 2025 मध्ये 141.95 टक्के भाडेवाढ करताना एक रुपयांच्या पटीत तिकीट दर निश्चित करण्यात आले होते. मात्र, त्यामुळे सुट्टया पैशांवरून प्रवासी आणि वाहक यांच्यात वारंवार वाद निर्माण झाल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. त्यामुळे यंदा पाच रुपयांच्या पटीत भाडे आकारण्याची शिफारस करण्यात आली आहे. यामुळे सुटते पैसे बाळगण्याची चिंता प्रवासी आणि वाहक दोघांची देखील कमी होईल, असा दावा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला आहे.
वर्षावर मध्यरात्रीची भेट; जयंत पाटील, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेलांच्या उपस्थितीने राजकीय चर्चांना उधाण
दरम्यान, एसटी महामंडळाने भाडेवाढीमागे वाढत्या खर्चाचा दाखल दिला आहे. कर्मचाऱ्यांच्या विविध भट्ट्यांमध्ये झालेली वाढ, जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे वाढलेले डिझेलचे दर, बस दुरुस्तीसाठी लागणाऱ्या सुट्या भागांच्या किंमतीत झालेली वाढ तसेच टायरच्या वाढलेल्या दरांमुळे महामंडळाच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आर्थिक ताळमेळ साधण्यासाठी भाडेवाढ अपरिहार्य असल्याची भूमिका महामंडळाने घेतली आहे.
मात्र, हंगामी भाडेवाढ लागू करून देखील एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती फारशी सुधारलेली नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. मे महिन्यात महामंडळाचे एकूण वाहतूक उत्पन्न 1 हजार 47 कोटी 17 लाख रुपये इतके नोंदवले गेले, तर त्याच कालावधीत खर्चाचा आकडा 1 हजार 96 कोटी 7 लाख रुपयांवर पोहोचला. म्हणजेच उत्पन्नापेक्षा खर्च सुमारे 49 कोटी रुपयांनी अधिक राहिला. विशेष म्हणजे राज्यातील 31 विभागांपैकी तब्बल 22 विभागांना स्वतःचा खर्च भागवण्याइतका देखील महसूल मिळवता आलेला नाही. त्यामुळे केवळ भाडेवाढ करून आर्थिक संकटावर मात करणे शक्य नसल्याचे चित्र समोर आले आहे.
एकीकडे महामंडळाला वाढत्या खर्चाचा सामना करावा लागत असताना दुसरीकडे वारंवार होणाऱ्या भाडेवाढीमुळे सामान्य प्रवाशांच्या खिशालाही कात्री लागत आहे. त्यामुळे आजच्या राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत 13.50 टक्के भाडेवाढीच्या प्रस्तावावर काय निर्णय होतो, याकडे राज्यभरातील लाखो एसटी प्रवाशांचे लक्ष लागले आहे.