Maratha Reservation : महाराष्ट्रात सध्या जो प्रश्न निर्माण झाला आहे तो सोडवण्याचा एकदम सोप्पा फॉर्म्युला मी दिला आहे. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी फक्त अर्धा तास द्यावा. तुम्ही रोज बैठका घेता त्या बैठकांतून वेळ काढून मला फक्त अर्धा तास द्या तुम्हाला फॉर्म्युला मी समजून सांगतो. त्यामुळे राज्यात जे सध्या वातावरण तयार झालं आहे ते निवळेल आणि मराठा समाजाला आरक्षणही मिळेल, अशा शब्दांत ओबीसी आरक्षणाचे अभ्यासक हरिभाऊ राठोड यांनी भूमिका स्पष्ट केली. राठोड यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा कसा निकाली काढता येईल याची माहिती दिली तसेच मंत्री छगन भुजबळ यांनाही थेट आव्हान दिले.
Manoj Jarange : ..तर मराठ्यांवर अन्यायच! हरिभाऊ राठोडांचा फॉर्म्युला जरांगेंनी फेटाळला
आरक्षणासंदर्भात तुम्ही दिलेला फॉर्म्युला मनोज जरांगे पाटलांनी फेटाळला अशी चर्चा सुरू असल्याचे पत्रकारांनी विचारले. त्यावर राठोड म्हणाले, 25 डिसेंबरला आम्ही जरांगे पाटलांना भेटलो होतो. त्यावेळी आम्ही मराठा आरक्षणाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा केली. पण, त्याचवेळी मला काही पत्रकारांनी सांगितलं की तुमचा फॉर्म्युला जरांगे पाटलांनी नाकारला आहे. पण असं काही नाही. त्यानंतर जरांगे पाटील स्वतः म्हणाले की आम्ही पाहू. आमच्या टीमला हा फॉर्म्युला दाखवू. त्यावेळी मी त्यांना असं सांगितलं होतं की जरांगे पाटलांनी सरकारला अशी विनंती करावी की सरकारने ओबीसी, बारा बलुतेदार, मराठा समाज तसेच मराठा समाजाचे जे अभ्यासक आहेत त्यांची एक बैठक बोलवावी. त्यानंतर माझा फॉर्म्युल आधी ओबीसी समाजाला आवडतो की नाही ते ठरवावं. ओबीसीतल्या 142 जाती अशा आहेत त्या म्हणतील की राठोड साहेबांचं म्हणणं बरोबर आहे आणि भुजबळ जे सांगतात ते चुकीचं आहे, असे राठोड म्हणाले.
छगन भुजबळांचा मराठ्यांना विरोध
छगन भुजबळ मराठ्यांना विरोध करतात. त्याचा अर्थ काय होतो तर आहे तसंच ठेवायचं. म्हणजे 19 टक्क्यांतच तुम्ही मराठा कुणबी ठेवणार आणि आणखी ज्या शोधलेल्या नोंदी आहेत त्या देखील त्यातच येऊन पडणार. म्हणून माझी भुजबळांना विनंती आहे की त्यांनी एकदा जस्टीस रोहिणी आयोगाचा अभ्यास करावा. त्यानंतर त्यांनी सांगावं की रोहिणी आयोगाला त्यांचा विरोध आहे का? विरोध असेल तर त्यांनी स्पष्ट तसं सांगावं. विरोध नसेल तर सब कॅटेगरेशन हाच एकमेव उपाय आहे. म्हणजेच ओबासींचं सब कॅटेगरेशन केल्याशिवाय आपण मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नाही.
Manoj Jarange : ठरलं तर! नगर-पुणे मार्गे मुंबईत धडकणार; जरांगे पाटलांनी ‘रुट’ केला जाहीर