रोहित पवारांच्या उपोषणाला काँग्रेसचा जाहीर पाठिंबा; हर्षवर्धन सपकाळ पंढरपुरात जाऊन बसणार उपोषणाला

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे स्वतः पंढरपूरमध्ये जाऊन रोहित पवार यांच्यासोबत उपोषणात सहभागी होणार आहेत.

Untitled Design (40)

Untitled Design (40)

Harshvardhan Sapkal to stage a hunger strike in Pandharpur : राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, तसेच कर्जमाफीवरील जाचक अटी रद्द करून सात-बारा कोरा करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला आता काँग्रेस पक्षानेही उघड पाठिंबा जाहीर केला असून, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे स्वतः पंढरपूरमध्ये जाऊन रोहित पवार यांच्यासोबत उपोषणात सहभागी होणार आहेत.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी सांगितले की, राज्य सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही फसवी असून त्यामधील जाचक अटींमुळे लाखो शेतकरी लाभापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे संपूर्ण कर्जमाफी करून शेतकऱ्यांना दिलासा देणे आवश्यक आहे. रोहित पवार यांनी मांडलेल्या मागण्या रास्त असून सरकारने त्या तातडीने मान्य कराव्यात, अशी भूमिका सपकाळ यांनी मांडली.

अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचा घात होऊ शकतो; शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ

यावेळी सपकाळ यांनी मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीच्या मुद्द्यावरूनही भाजप आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधला. काँग्रेसच्या उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज चुकीच्या पद्धतीने फेटाळण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. ज्या नोटिशीच्या आधारे अर्ज बाद करण्यात आला होता, ती नोटीस तेलंगणातील न्यायालयाने रद्द केल्याचा दावा करत, आता मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणूक रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

तसेच, मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज फेटाळून त्यांचा निवडणूक लढवण्याचा अधिकार हिरावून घेणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर काय कारवाई केली जाणार, असा सवालही हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला. दरम्यान, रोहित पवार यांच्या उपोषणाला काँग्रेसने दिलेला पाठिंबा आणि सपकाळ यांचा प्रत्यक्ष सहभाग यामुळे राज्यातील शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा अधिकच तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

Exit mobile version