उजनीतील एआय डेटा सेंटर विकास की विनाश? 9 टीएमसी पाण्याच्या वापरावरून रोहित पवारांचा सरकारला सवाल

रोहित पवार यांच्या दाव्यानुसार, प्रस्तावित एआय डेटा सेंटरसाठी सहा टीएमसी, तर अणुऊर्जा प्रकल्पासाठी तीन टीएमसी पाणी लागणार आहे.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 10 29T181415.916

Rohit Pawar questions the government over AI data center : उजनी येथे प्रस्तावित एआय डेटा सेंटर आणि अणुऊर्जा प्रकल्पांच्या पाणी वापरावरून आमदार रोहित पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. या प्रकल्पांसाठी एकूण नऊ टीएमसी पाणी लागणार असल्याचा दावा करत, त्याचा परिणाम साडेपाच लाख शेतकरी आणि 30 हजार मच्छीमार कुटुंबांच्या अर्थकारणावर होऊ शकतो, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. उजनीतील एआय डेटा सेंटर हा विकास की विनाश? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

रोहित पवार यांच्या दाव्यानुसार, प्रस्तावित एआय डेटा सेंटरसाठी सहा टीएमसी, तर अणुऊर्जा प्रकल्पासाठी तीन टीएमसी पाणी लागणार आहे. ठाणे शहराला वर्षभरात सुमारे 8.25 टीएमसी पाणी लागते. त्या तुलनेत या दोन प्रकल्पांसाठी नऊ टीएमसी पाणी लागणार असल्याचे पवार यांनी सांगितले. उजनी धरणाच्या पाण्यावर शेती, मासेमारी आणि अनेक कुटुंबांचे अर्थकारण अवलंबून आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वापरल्यास स्थानिक नागरिकांच्या गरजांवर परिणाम होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

सरकारने उजनी परिसरात दोन हजार मेगावॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प आणि 450 मेगावॉट क्षमतेचा अणुऊर्जा प्रकल्प प्रस्तावित केल्याचे सांगितले जात आहे. या प्रकल्पांसह एआय डेटा सेंटरमध्ये सुमारे एक लाख 65 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याचा दावा आहे. चीनमधील सॅनी कंपनीकडून तरंगता सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे नियोजन असून, फ्रान्स आणि दक्षिण कोरियातील कंपन्यांचाही सहभाग असल्याचे पवार यांनी म्हटले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत एसीबीची कारवाई, मुख्य अभियंता प्रवीण ओंबासे अडकला

उजनीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या साडेपाच लाख शेतकऱ्यांची सुमारे दहा हजार कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल असल्याचा दावा पवार यांनी केला. तसेच जलाशयातील मासेमारीवर सुमारे 30 हजार कुटुंबे अवलंबून असून, या व्यवसायातून जवळपास 200 कोटी रुपयांची उलाढाल होते. जलाशयावर तरंगते सौरऊर्जा पॅनेल बसवल्याने माशांच्या अधिवासावर आणि जलचरांवर परिणाम होऊ शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. यासाठी त्यांनी मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर येथील तरंगत्या सौरऊर्जा प्रकल्पाचा दाखला दिला.

एआय डेटा सेंटरमधील सर्व्हर थंड ठेवण्यासाठी पाणी आणि मोठ्या प्रमाणावर वीज लागते. या प्रकल्पामुळे वाढणारी वीज मागणी, शीतकरण यंत्रणांचा आवाज आणि पाणीवापर यांचाही पर्यावरणावर परिणाम होऊ शकतो, असे पवार यांनी म्हटले. एकीकडे मोठ्या गुंतवणुकीतून विकासाची अपेक्षा आहे, तर दुसरीकडे शेती, मासेमारी आणि पर्यावरणाच्या संरक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे प्रकल्पांचा पाणीवापर, पर्यावरणीय परिणाम आणि स्थानिक नागरिकांच्या गरजा याबाबत सरकारने स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी या मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर पुढे येत आहे.

follow us