बंगालच्या उपसागरात पुन्हा चक्रीवादळाचे संकेत, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा!

शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली असली, तरी अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान होण्याची भीती देखील व्यक्त होत आहे.

Untitled Design   2026 11 01T084840.126

Untitled Design 2026 11 01T084840.126

Heavy rainfall warning for several districts in Maharashtra! : राज्यात एकीकडे दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे वातावरणातील बदलांमुळे पावसाचे नवे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात आज नव्याने चक्रीवादळसदृश प्रणाली सक्रिय होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. यापूर्वी अर्णब चक्रीवादळाच्या प्रभावनानंतर आता नव्या वादळी प्रणालीमुळे राज्यातील काही भागांत पावसाळा पोषक वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः विदर्भात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत देखील हलक्या ते माध्यम स्वरूपाच्या सारी कोसळण्याचा अंदाज आहे.

राज्यात यंदा पावसाने अपेक्षित साथ न दिल्याने अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणीसाठा, पिकांची अवस्था आणि शेतीच्या कामांवर त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. अशा परिस्थितीत पावसाच्या नव्या अंदाजासह काही भागांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली असली, तरी अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान होण्याची भीती देखील व्यक्त होत आहे.

हवामानातील बदलामुळे पूर्व विदर्भात पावसाळा पोषक स्थिती निर्माण झाली आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. त्यामुळे संबंधित जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अचानक बदलणारे हवामान आणि विजांचा धोका लक्षात घेता नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रात्रीच्या अंधारात मृत्यूचा थरार! उड्डाणपुलाचा कठडा तोडून कंटेनर हॉटेलवर आदळला, दोघांचा जागीच अंत

मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि हिंगोली जिल्ह्यांत हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याचा अंदाज आहे. नांदेड जिल्ह्यातही पावसाची शक्यता कमी असून हवामान कोरडे राहू शकते.

बीड जिल्ह्यातील आष्टी परिसरात शुक्रवारी (ता. ३१ ऑक्टोबर) सायंकाळी पावसाने हजेरी लावली. दिवसभर उष्णतेनंतर सायंकाळी आकाशात ढगांची दाटी झाली आणि काही वेळातच पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे परिसरातील वातावरणात गारवा निर्माण झाला. नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी संपूर्ण जिल्ह्याला अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. विहिरी, बोअरवेल आणि पाणीसाठ्यांवरील ताण कमी होण्यासाठी मोठ्या पावसाची गरज असल्याने शेतकऱ्यांचे लक्ष आकाशाकडे लागले आहे.

पश्चिम महाराष्ट्रातही काही भागांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात मेघगर्जनेसह सरी कोसळण्याचा अंदाज असून घाटमाथ्यावरील भागांत पावसाची शक्यता अधिक आहे. कोल्हापूर जिल्हा आणि घाटमाथा परिसरातही विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. सातारा आणि सांगली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पावसाच्या सरींची शक्यता कायम आहे. मात्र, सोलापूर जिल्ह्यात हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याचा अंदाज आहे.

मतदारांची नावं वगळल्याचा हिशेब द्यावाच लागेल; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांना इशारा

याशिवाय नाशिकच्या घाटमाथ्यावरील परिसरासह अहिल्यानगर जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्याच्या विविध भागांत ढगाळ वातावरण निर्माण होऊन तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

वातावरणातील बदलांचा परिणाम राज्यातील कमाल तापमानावरही झाला आहे. अनेक भागांत ढगाळ हवामानामुळे तापमानात काहीशी घट झाली आहे. शनिवारी (ता. ३१ ऑक्टोबर) सकाळपर्यंतच्या २४ तासांत डहाणू येथे राज्यातील उच्चांकी ३५.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जेऊर आणि सोलापूर येथेही तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहिले. दुसरीकडे धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १६.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी उष्णता, तर काही भागांत थंडावा आणि ढगाळ वातावरण असे संमिश्र चित्र पाहायला मिळत आहे.

राज्यातील अनेक भागांत पावसाअभावी शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. परतीच्या पावसाकडून अपेक्षा असतानाही दमदार पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अशा वेळी बंगालच्या उपसागरातील संभाव्य वादळी प्रणालीमुळे राज्यातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, हा पाऊस किती प्रमाणात आणि कोणत्या भागांत होणार, यावरच त्याचा शेतीला होणारा फायदा अवलंबून असेल. विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांनी शेतात काम करताना झाडाखाली आश्रय घेणे टाळावे आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे.

Exit mobile version