Helicopter makes a wrong landing : पुणे जिल्ह्यातील पुरंदर ताल्यक्यामधील खानवडी येथे हेलिकॉप्टर लॅण्डिंगदरम्यान झालेल्या गंभीर चुकीमुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे महात्मा फुले जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी येथे येत होते. कार्यक्रमासाठी स्वतंत्र हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, खानवडी गावात पोहोचलेल्या हेलिकॉप्टरच्या पायलटला कार पार्किंगमधील मोकळी जागाच हेलिपॅड असल्याचा भास झाला आणि त्याने थेट तिथेच लँडिंग केले. या अनपेक्षित प्रकारामुळे उपस्थितांमध्ये एकाच खळबळ उडाली.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पार्किंगमध्ये काही वाहने उभी असली तरी कोणालाही गंभीर दुखापत झाल्याची नोंद नाही. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत पायलटला योग्य माहिती दिली आणि हेलिकॉप्टर सुरक्षितरित्या तिथून हलवण्यात आले. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला. योग्य नियोजन असताना देखील चुकीच्या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरवणे अत्यंत धोकादायक असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः लोकवस्तीच्या जवळ अशी चूक मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरू शकली असती, अशी भीती देखील व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, प्रशासनाकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. हेलिपॅड स्पष्ट दिसत होते का, पायलटकडून नेमकी चूक कशी झाली किंवा काही तांत्रिक अडचण होती का, याचा सखोल तपास केला जाणार आहे. या घटनेनंतरही छगन भुजबळ सुरक्षित असून त्यांनी आपला पुढील कार्यक्रम नियोजनानुसार पूर्ण केला. मात्र, या प्रकारामुळे सुरक्षा व्यवस्थेवर आणि समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून भविष्यात अशा चुका टाळण्यासाठी अधिक दक्षता घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
