Download App

Maharashtra Politics : महाराष्ट्राचा ‘सरताज’ सांभाळाचाय; खुद्द पवारांनी सांगितला पुढचा प्लॅन

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष बारामतीत होणाऱ्या लढतीकडे लागल्या होत्या.

  • Written By: Last Updated:

बारामती : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष बारामतीत होणाऱ्या लढतीकडे लागल्या होत्या. या हाय व्होलटेज लढतीत अखेर शरद पवारांच्या (Sharad Pawar) कन्या सुप्रिया सुळेंनी बाजी मारली. त्यानंतर पहिल्यांदाच पवारांनी बारामतीचा विजय कसा मिळवला यावर भाष्य केले आहे. शरद पवार सध्या त्यांच्या पक्षाच्या जनसंवाद कार्यक्रमादरम्यान राज्यभर फिरत आहेत. आज (13 जून) त्यांनी बारामतीतल्या शिर्सुफळ या गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी बारामतीच्या विजयाची गोष्ट उघडपणे सांगितली आहे. यावेळी विधानसभेला राज्य काबीज करण्यासाठी काय प्लॅनिंग आहे यावरही भाष्य केले. (Sharad Pawar On Baramati Loksabha Election Victory)

Video : राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांचं नाव कसं फिक्स झालं?; भुजबळांनी आतली बातमी फोडली

काय म्हणाले पवार?

बारामतीतल्या शिर्सुफळ या गावात बोलताना पवार म्हणाले की, संपूर्ण देशाचं बारामतीकडे लक्ष होतच, परंतु जगभरातील अनेकांचं लक्ष बारामतीकडे लागलं होतं. अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरात जगभर काय काय चाललंय त्याचे पोस्टर किंवा बोर्ड लावले जातात. तिथल्या एका बोर्डवर बारामतीच्या निवडणुकीची माहिती होती. म्हणजे बघा बारामती कुठपर्यंत पोहोचली आहे. याचाच अर्थ लोकांचं निवडणुकीकडे लक्ष होतं आणि त्याचा परिणाम निकालातून दिसून आला. लोकांचं लक्ष का लागलं होतं हे मी वेगळं सांगायची गरज नाही, कारण ते तुम्हाला माहिती आहे असे पवार म्हणाले.

तुमच्या शांतीनं क्रांती घडली

पुढे बोलताना पवार म्हणाले की, निवडणुकीच्या प्रचारकाळात जनता उघडपणे बोलत नव्हता. प्रचारसभांध्ये मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पण कुणी बोलायला तयार नव्हते. त्यामुळे आमचे पदाधिकारी माझ्याकडे येऊन लोक बोलत नाहीत असे सांगायचे. तेव्हा मी त्यांना म्हणायचो की, तुम्ही काळजी करू नका. लोक आज जरी बोलत नसले तरी मतदानाच्या दिवशी ते योग्य बटन दाबतील आणि झालेही तसेच तुमच्या शांतीनचं बारामतीच्या विजयाचं गणित जुळलं आणि विजयी माळ सुप्रिया सुळेंच्या गळ्यात पडली.मतपेटी काय चमत्कार करू शकते हे इथल्या लोकांनी दाखवून दिलं. मतदानाच्या वेळी इथलं एकही गाव मागे राहिलं नाही. तुम्ही सर्वांनी मतदानाचा विक्रम केल्याचेही पवार म्हणाले.

मोठी बातमी : विधानसभेसाठी ‘राज’ खेळी, मोदींना पाठिंबा देणारे राज ठाकरे देणार मोठा धक्का

मोदींनी नाही त्या गोष्टी बोलून दाखवल्या

यावेळी पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही भाष्य केले. ते म्हणाले की, पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीकडे लक्ष देण्याचं आणि एवढी चर्चा होण्याचं कारण देशाच्या प्रधानमंत्र्यांनी या निवडणुकीत फार लक्ष घातलं. काही गोष्टी निवडणुकीत सांगायच्या नसतात, बोलायच्या नसतात त्या त्यांनी बोलून दाखवल्या. त्यामुळे लोक अस्वस्थ झाली व त्यांचा निकाल मतपेटीतून दिल्याचे पवार म्हणाले.

राज्य हातात घ्यायचं असेल तर…

तीन- चार महिन्यांनी महाराष्ट्राची निवडणूक येणार आहे. माझा प्रयत्न हा आहे की, काहीही झालं तरी महाराष्ट्राचं राज्य हातात घ्यायचं आहे आणि ते घ्यायचं असेल तर विधानसभा जिंकावी लागेल. ती वेळ माझ्या माहितीप्रमाणे ऑक्टोबर महिन्यामध्ये येईल. त्यावेळेला आपलं काम असंच चालू ठेवा, चांगले लोक आपण महाराष्ट्रात आणू आणि त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे राज्य हातामध्ये आणू. हे काही अशक्य नाही, तुम्ही लोकांनी मला चार वेळा निवडून दिलं. चार वेळा मुख्यमंत्री, दहा वेळा शेती मंत्री, दोन वर्ष संरक्षण खात्याचा मंत्री या सगळ्या गोष्टी तुम्हा लोकांच्या सामूहिक शक्तीने घडू शकतात. तुम्ही जे प्रश्न या ठिकाणी मांडले त्या लगेचच्या लगेच सुटतील याचा प्रयत्न होईल. पण सांगता येत नाही कारण सरकार दुसऱ्याचं आहे. चार महिन्यांनी निवडणूक झाल्यानंतर राज्य हातात आल्यावर तुमची सुटका केल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही एवढंच सांगतो असा शब्द पवारांनी गावकऱ्यांना दिला.

follow us