Nilesh Lanke on Sangram Bapu Bhandare : माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना मारण्याची धमकी देणारे कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांच्या व्हिडिओने राज्यभर मोठी खळबळ उडाली असून भंडारे यांनी (Lanke) व्हिडिओद्वारे आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल अशी थेट धमकी दिली असून यामुळे आता राज्यात संतापाची लाट उसळली आहे. थोरातांच्या समर्थनासाठी महाविकास आघाडीचे नेते एकवटले आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह लंके व तांबे यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे.
खासदार लंकेंनी केला निषेध
संगमनेर मध्ये प्रवचन सांगणाऱ्या व्यक्तीच्या तोंडी नथुरामाची भाषा आहे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे समाजातील विघातक वृत्तींना विरोध करतात म्हणून त्यांना उघडपणे जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. गृहमंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे. राज्यात पोलिसांचा धाक आहे की नाही? कीर्तनकार आता राज्याचे महसूल मंत्री राहिलेल्या व्यक्तीला उघडपणे जीवे मारण्याची धमकी देत आहेत हे योग्य आहे का? महाराष्ट्रातील राजकारण आजपर्यंत कधीच इतक्या खालच्या थराला गेले नाही कीर्तनामध्ये विशिष्ट नेत्यांचा प्रचार करीत असेल, द्वेषाचे राजकारण जर कोणी करत असेल. तर त्याला प्रश्न विचारणे हा सुद्धा खरा धर्म आहे. जर एखादी व्यक्ती असे द्वेषाचा विचार नारदाच्या गादीवर राहुन मांडत असेल, खोट्या हिंदुत्वाच्या नावाखाली तरुणांची दिशाभूल करत असेल.. तर त्यांना महाराज चुकीचे सांगू नका तुम्ही अभंगावर बोला हे सांगणं पण चुकीचे आहे का? असा संतप्त सवाल खासदार निलेश लंके यांनी केला.
मामांसाठी भाचा उतरला रिंगणात
बाळासाहेब थोरात यांच्यावर टिका करताना विरोधक सुध्दा जपून शब्द वापरतात त्यामुळे संत-महात्म्यांची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात स्वतः ला कीर्तनकार म्हणून घेणाऱ्या एका उध्दट व्यक्तीने त्यांच्या विषयी जे काही बोलले ते महाराष्ट्रातील कोणत्याही वारकरी संप्रदायातील किर्तनकारांना आवडलेले नाही.
कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्याकडून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना धमकी
सहकार, शिक्षण, कृषी, सांस्कृतिक सगळ्याच क्षेत्रात अग्रेसर असलेल्या संगमनेरचे नाव बदनाम करण्याचा काही घटना मागील काळात सातत्याने सुरु करण्यात आल्यात. या घटना फक्त राजकीय नाहीत किंवा फक्त थोरात यांच्याशी संबंधित नाही, मध्यंतरी संगमनेरचे नाव देशभर प्रसिद्ध करणाऱ्या एका उद्योगपतीला त्याने “ होर्डिंगमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याचे “ बोलल्याबद्दल फार वाईट भाषेत टीका सहन करावी लागली.
आज संगमनेरच्या सहकारी व सहकारी बॅंकांमधील ठेवी आज ७००० कोटींच्या घरात आहेत, संगमनेरात रोज ९ लाख लिटर दूध तयार होते, संगमनेर मधील दोनच गावात कुक्कुटपालनातून रोज ७ लाख अंडे तयार होतात, संगमनेर कारखाना राज्यातील एक उत्कृष्ट सहकारी साखर कारखाना म्हणून ओळखला जातो, संगमनेरमध्ये ५ मेडिकल कॉलेज आहेत ज्यातील चार बाळासाहेब थोरातांच्या विरोधकांचे आहेत म्हणजेच येथे द्वेषाचे राजकारण नाही, संगमनेरात सगळ्या शिक्षण संस्था मिळून २५००० मुले-मुली उच्च शिक्षण घेतात. प्रवरा नदीला पाणी नसतांना संगमनेर शहराला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत होती आता निळवंडे धरणातून २४ तास स्वच्छ पाणी भेटते.
हे काय उगाच झालेले नाही, पर्जन्य छायेच्या भागात असलेला व एके काळचा दुष्काळी तालुका आज सुजलाम सुफलाम झाला यात स्वातंत्र्य सेनानी स्व. भाऊसाहेब थोरात व त्यांच्या नंतर बाळासाहेब थोरात यांचे प्रचंड योगदान आहे जे कोणीही शहाणा माणूस नाकारू शकत नाही. कालच्या तथाकथित कीर्तनकाराची टिका ही राजकीय तर आहेच पण संगमनेरच्या सामाजिक घडीला बदनाम करणारी आहे. संगमनेरची स्वाभिमानी जनता हे कधीही सहन करणार नाही !
फडणवीस काय भूमिका घेणार?
कीर्तनातून समाज प्रबोधनाऐवजी राजकारण्यांची स्तुती करण्याचा घाट घातला जात असल्याने वारकरी संप्रदायाबाबय शंका उपस्थित केल्या जात असल्याच्या चर्चा आता होऊ लागल्या आहे. दरम्यान हे प्रकरण आता चांगलेच तापू लागले आहे. आता यावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.