Illegal drug business was being run in Pune through an app : शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक ड्रग्स रॅकेट उघडकीस आलं आहे. वारजे आणि उत्तमनगर परिसरात एका नामांकित डिलिव्हरी अँपच्या माध्यमातून अंमली पदार्थांची विक्री सुरू असल्याचं समोर आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा उलगडा रेकॉर्डवरील गुन्हेगार सुनील राठोड याच्या अटकेनंतर आला.
अपहरणाच्या गुन्ह्यात तो पोलिसांना हवा होता. अटकेनंतर झालेल्या चौकशीत त्याने अंमली पदार्थांच्या विक्रीत सहभाग असल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तपासाचा वेग वाढवत या रॅकेटमधील आणखी तीन आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राजन नायर, शुभम दहिभाते आणि जतीन कदम यांचा समावेश आहे. या प्रकरणात आणखी चार आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
CIA चा गुप्त प्रोजेक्ट अन् ओरॅकलचा जन्म; भारतात 12 हजार कुटुंबांवर संक्रांत आणणाऱ्या कंपनीचा प्रवास
या कारवाईदरम्यान पोलिसांनी एमडी या अंमली पदार्थाचा मोठा साथ जप्त केला विशेष बाब म्हणजे आरोपी ग्राहकांपर्यंत ड्रग्स पोहोचवण्यासाठी डिलिव्हरी अँपचा वापर करत होते. या पद्धतीमुळे संशय न येता सहजपणे अंमली पदार्थांची डिलिव्हरी केली जात होती. तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या रॅकेटद्वारे तब्बल 300 हुन अधिक व्यवहार करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामुळे सुमारे 300 जणांना अंमली पदार्थांचा पुरवठा करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. संशयित आरोपीच्या घराची झडती घेतली असता एमडी ड्रग्सची दोन पाकिटे सापडली, आणि त्यानंतर सखोल तपासातून संपूर्ण रॅकेट उघडकीस आले. या प्रकरणामागे मोठं आणि संघटित जाळं कार्यरत असल्याचा संशय असून, गुन्हे शाखा आणि उत्तमनगर पोलीस संयुक्तपणे तपास करत आहेत. या तपासातून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
