CIA चा गुप्त प्रोजेक्ट अन् ओरॅकलचा जन्म; भारतात 12 हजार कुटुंबांवर संक्रांत आणणाऱ्या कंपनीचा प्रवास
Oracle Layoff ओरॅकलने क्लाउड कॉम्प्युटिंग आणि AI च्या माध्यमातून आधुनिक उद्योगांचा 'डिजिटल ब्रेन' आपल्या ताब्यात घेतला आहे.
Oracle Layoff : ज्या कंपनीचा जन्म CIA च्या एका गुपित मिशनमधून झाला, जिने जगाचं ‘डिजिटल डोकं’ चालवलं… आज त्याच Oracle ने भारतात एका झटक्यात १२,००० कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवलाय! हा केवळ ले-ऑफ आहे की AI मुळे येणाऱ्या महाप्रलयाचा इशारा? जाणून घेऊया ओरॅकलचा हा ‘इनसाइड रिपोर्ट’…
22 वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली! आता बदलता येणार तुमचा Gmail ID; सुंदर पिचाईंची मोठी घोषणा
CIA चं कोडनेम’ आणि ओरॅकलचा जन्म
ओरॅकलची सुरुवात एखाद्या हॉलिवूड थ्रिलरपेक्षा कमी नाही. १९७७ मध्ये लॅरी एलिसन यांनी ही कंपनी सुरू केली, तेव्हा तिचं नाव होतं ‘सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लॅब्स’. पण पुढे हे नाव बदलून ‘Oracle’ ठेवण्यात आलं. हे नाव आलं अमेरिकन गुप्तहेर संस्था CIA च्या एका टॉप-सिक्रेट प्रोजेक्टच्या ‘कोडनेम’वरून! अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटीसाठी डेटा सांभाळण्याचं पहिलं काम याच कंपनीने केलं. तेव्हापासून आजपर्यंत, जागतिक सत्तेच्या केंद्रस्थानी ओरॅकलचा मोठा वाटा राहिला आहे.
भारतात १२ हजार कुटुंबांवर संक्रांत!
२०२५ च्या अखेरीस ओरॅकलकडे जगभरात १.६२ लाख कर्मचारी होते. मात्र, आता कंपनी जागतिक स्तरावर ३०,००० लोकांना कमी करण्याच्या तयारीत आहे. या कपातीचा सर्वात भीषण फटका भारताला बसलाय. भारतात असलेल्या ३०,००० कर्मचाऱ्यांपैकी तब्बल १२,००० जणांच्या नोकऱ्या गेल्याचा दावा अनेक रिपोर्ट्समध्ये केला जातोय. अद्याप कंपनीने अधिकृत मौन पाळलं असलं, तरी आयटी क्षेत्रात या ‘डिजिटल त्सुनामी’ने मोठी खळबळ उडवून दिली आहे.
गुगलची मोठी घोषणा! भारतात AI Mode लाँच; डेटा सर्च होणार आणखी सोपं
बँकिंगपासून सॅलरीपर्यंत… सर्वत्र ओरॅकल!
आजच्या युगात डेटा हाच ‘खजिना’ आहे आणि ओरॅकल या खजिन्याचा सर्वात मोठा रखवालदार आहे. कारण, रेल्वे तिकीट बुकिंग असो, बँकिंग व्यवहार असोत की, सरकारी यंत्रणा या सर्वांचा अवाढव्य डेटा ओरॅकलच्या सॉफ्टवेअरवरच धावतो. ही कंपनी आता केवळ सॉफ्टवेअरपुरती उरलेली नाही, तर क्लाउड कॉम्प्युटिंग आणि AI च्या माध्यमातून तिने आधुनिक उद्योगांचा ‘डिजिटल ब्रेन’ आपल्या ताब्यात घेतला आहे. कंपन्यांना आता स्वतःचे सर्व्हर किंवा हार्डवेअर घेण्याची गरज उरलेली नाही, कारण ओरॅकलचा क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर हाच जगातील डिजिटल सिस्टिम्सचा कणा बनला आहे.
एकाच छताखाली पूर्ण ‘आयटी साम्राज्य’ अन् ओरॅकलचा बदलता चेहरा
ओरॅकल हे केवळ डेटाबेस सॉफ्टवेअर नाही, तर कंपन्यांसाठी एक संपूर्ण ‘ऑपरेटिंग सिस्टिम’ बनलं आहे. एचआर मॅनेजमेंट (HR), फायनान्स, सप्लाय चेन आणि कस्टमर मॅनेजमेंट यांसारख्या अत्यंत गुंतागुंतीच्या यंत्रणा एकाच प्लॅटफॉर्मवर आणण्याचं कसब ओरॅकलने साधलं आहे. यामुळेच जगातील मोठ्या कंपन्या कर्मचाऱ्यांचा पगार काढण्यापासून ते ग्राहकांचा डेटा सुरक्षित ठेवण्यापर्यंतच्या सर्व कामांसाठी ओरॅकलवर विसंबून आहेत.
मात्र, आता ओरॅकल एका मोठ्या संक्रमणातून जात आहे. कंपनीचं संपूर्ण लक्ष आता AI आणि ऑटोमेशनवर केंद्रित झालं आहे. ओरॅकल आता असे ‘स्मार्ट टूल्स’ विकसित करत आहे, जे केवळ डेटा साठवणार नाहीत, तर तो स्वतः समजून घेऊन निर्णय प्रक्रियेत मदत करतील. पूर्वी जे काम करण्यासाठी शेकडो कर्मचाऱ्यांची गरज भासायची, तिथे आता मशीन आणि AI चं वर्चस्व वाढत आहे. ही तांत्रिक प्रगती कंपनीची शक्ती असली, तरी याच बदलांमुळे ओरॅकलच्या अंतर्गत रचनेत आणि मनुष्यबळात आता मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत.
Iran War : गर्जना युद्धाची की सुप्त थकव्याची? ट्रम्प यांच्या 18 मिनिटांच्या भाषणाचं सखोल विश्लेषण!
एवढी मोठी कंपनी टोकाचं पाऊलं का उचलतेय?
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, एवढी मोठी कंपनी एवढ्या टोकाचं पाऊलं का उचलतेय? तर, याचं उत्तर आहे AI ची शर्यत. ओरॅकल आता आपला मोर्चा डेटा सेंटर आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे वळवत आहे. OpenAI सारख्या मोठ्या पार्टनर्ससोबत काम करताना कंपनीला अब्जावधी डॉलर्सची गरज आहे. तज्ज्ञांच्या मते, AI प्रोजेक्ट्ससाठी 10 अब्ज डॉलर्सपर्यंतची म्हणजेच सुमारे ८३ हजार कोटी रुपये बचत करण्यासाठी ही कर्मचारी कपात केली जात आहे. म्हणजे सोप्या भाषेत जिथे कालपर्यंत हजारो माणसं काम करायची, तिथे आता मशीन आणि AI काम करणार आहे.
IT सेक्टरसाठी काय संकेत?
ओरॅकलमधील ही छंटनी केवळ एका कंपनीची गोष्ट नाही. हा संपूर्ण आयटी सेक्टरसाठी एक मोठा इशारा आहे. भविष्यात नोकऱ्यांचे स्वरूप बदलणार आहे. तांत्रिक कौशल्य नसेल तर मशीन माणसांची जागा घेतील, हे ओरॅकलने दाखवून दिलंय. ज्या CIA मुळे कंपनी उभी राहिली, ती आता AI च्या जोरावर जगावर राज्य करायला निघाली आहे, पण या प्रवासात हजारो कर्मचाऱ्यांची स्वप्नं मात्र धुळीला मिळाली आहेत.