Gas Refilling Racket : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत बेकायदेशीर गॅस रिफिलींगचा काळाबाजार उघडकीस आणला आहे. तपोवन रोडवरील दक्षतानगर भागात छापा टाकून पोलिसांनी 21 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून यामध्ये भारत व एचपी कंपनीच्या तब्बल 133 घरगुती व कमर्शियल टाक्यांचा समावेश आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखालील पथक जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाई करत होते. तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत असताना, तपोवन रोड येथील दक्षतानगरमध्ये किरण संतोष गलांडे यांच्या गाळ्यामागील मोकळ्या जागेत घरगुती गॅस टाक्यांमधून कमर्शियल टाक्यांमध्ये विनापरवाना गॅस भरून चोरीने विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली.
पथक तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदयाची माहिती घेत असताना गोपनीय माहिती मिळाली की, इसम नामे किरण संतोष गलांडे, रा.दक्षतानगर, तपोवन रोड, अहिल्यानगर हा त्याचे मालकीचे गाळयाचे पाठीमागील मोकळया जागेत घरगुती वापराच्या गॅस टाक्यामधून कमर्शियल गॅस टाक्यामध्ये रिफीलिंग करण्यासाठी ठेवल्या असून तो विना परवाना चोरून गॅसची विक्री करत आहे.मिळालेल्या माहितीवरून पथकाने पंचासमक्ष नमूद ठिकाणी जाऊन खात्री केली असता तेथे दोन इसम हे घरगुती गॅस टाक्यास इलेक्ट्रीक मोटार जोडून वजन काटयावर ठेवली असताना मिळून आले.त्यांचेकडे घरगुती व कमर्शियल गॅस टाक्या वापर व परवाण्याबाबत विचारपूस करता त्यांनी परवाना नसल्याचे सांगितले.
पथकाने छापा टाकुन 1) कल्ला रघुराज सिंग, वय 24, रा.गजानन कॉलनी, एमआयडीसी, बोल्हेगाव, ता.अहिल्यानगर 2) गौरव राजेंद्र आढाव, वय 34, रा.आढाववाडी, पिंपळगाव माळवी, ता.अहिल्यानगर यांना ताब्यात घेतले.ताब्यातील आरोपीकडे व्यवसायाच्या मालकीबाबत विचारपूस करता त्यांनी सदरचा व्यवसाय हा 3) किरण संतोष गलांडे, रा.दक्षतानगर, तपोवन रोड, अहिल्यानगर (फरार) याचे मालकीचे असून रिफीलींग करण्यासाठी लागणाऱ्या घरगुती गॅस टाक्या या 4) नितीन कदम पुर्ण नाव माहित नाही, रा.पाईपलाईन रोड, अहिल्यानगर (फरार) याचेकडून खरेदी केल्या असल्याची माहिती सांगितली.
पथकाने पंचासमक्ष ताब्यातील आरोपीचे कब्जातून 21,80,000/- रुपये किंमती त्यात भारत गॅस कंपनीच्या 56 घरगुती, 46 कमर्शियल गॅस टाक्या भरलेल्या व 2 घरगुती गॅस टाक्या रिकाम्या, एचपी गॅस कंपनीच्या 23 घरगुती, 3 कमर्शियल गॅस टाक्या भरलेल्या व 3 कमर्शियल गॅस टाक्या रिकाम्या, 2 इलेक्ट्रीक मशीन, 2 इलेक्ट्रीक वजन काटे, 4 छोटा हत्ती वाहन, 1 बोलेरो पिकअप, 1 ओमिनी कार, 1 गॅस टाकीस सील बसविण्यासाठी हिट गन मशीन व 30 गॅस टोपण, प्लास्टीक लेबल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यातील आरोपीस मुद्देमालासह तोफखाना पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले असून, वर नमूद आरोपीविरूध्द तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
